sanjay-raut-narendra-modi-ram-mandir
वेब टीम : मुंबई
राम मंदिराचे भूमिपूजन काही वेळातच अयोध्येत होत आहे. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून आठवणींना उजाळा दिला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण त्यावेळी आंदोलनात असलेल्या अनेकांना देण्यात आलेले नाही.
राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्य़ा कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास... अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर शाब्दिक वार केला आहे.
काय म्हटले आहे सामनात..
‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोट्यवधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे. त्या सगळय़ांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे. पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल! सारा देश आज एकसुरात गर्जत आहे, जय श्रीराम!
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राममंदिराचे भूमिपूजन करीत आहेत. शरयू नदीने तेव्हा राममंदिरासाठी गोळ्या झेलणाऱ्य़ा शेकडो कारसेवकांना पोटात घेतले. रामभक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीच्या तीरावर भव्य मंदिराचा संकल्प पूर्ण होत आहे. हा ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक हिंदुस्थानीयाची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण आहे. ‘रामायण’ हा हिंदुस्थानी जनतेचा प्राण आहे. राम हा ‘रामायणा’चा प्राण आहे. राम हा मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी आहे. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे साहस आहे. राम म्हणजे आपल्या देशाची एकात्मता आहे. अशा रामाचे मंदिर त्याच्याच अयोध्या नगरीत, त्याच्या जन्मस्थानी व्हावे यासाठी हिंदूंना मोठा लढा द्यावा लागला. त्या लढय़ाची सांगता आज होत आहे.
हा लढा प्रत्यक्ष भूमीवर झाला आणि न्यायालयातही झाला. राममंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या न्यायालयीन लढाईतील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी याला पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर रामजन्मभूमीचा वाद संपलेला आहे. इक्बाल अन्सारी हा एकटा नव्हता, पण न्यायालयात राममंदिरविरोधी लढा देणाऱ्य़ा बाबरी ऍक्शन कमिटीचा तो एक प्रमुख चेहरा होता. त्याच्या पाठीमागे अनेक इस्लामी संघटनांनी मोठी शक्ती उभी केली होती. अन्सारीने न्यायालयातली लढाई 30 वर्षे खेचली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले, पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्या. रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही.
राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्य़ा कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे. अर्थात जिथे श्रीराम हे कौटुंबिक राजकारण व अंतर्विरोधाचे बळी ठरले, तिथे इतर पामरांचे काय? अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर बांधण्याचा निर्धार करून विश्व हिंदू परिषद, शिवसेना, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार यांना तोंड देत पुढे गेले. त्यात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. दुर्दम्य आकांक्षेसाठी जेव्हा लोक प्राण देण्यास तयार होतात तेव्हा केवळ कायदा आणि न्यायालयांच्या सबबी अपुऱ्य़ा पडतात. लोकशाहीत लोकेच्छा प्रमाण मानावयास हवी. राममंदिराच्या राजकारणाबाबत वेगळी भूमिका असूनही काँगेस, समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांतील अनेक जण मंदिर व्हावे या श्रद्धेचे होते. त्या सगळय़ांच्या भावनांची कदर होणे गरजेचे आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राममंदिराचे श्रेय पी. व्ही. नरसिंह राव व राजीव गांधी यांना दिलेच आहे. पंतप्रधान मोदी यांना ते राममंदिराचे श्रेय द्यायला तयार नाहीत, पण मोदी यांच्या काळातच न्यायालयाच्या गुंत्यातून राममंदिर सुटले व आजचा सुवर्णक्षण उगवला हे मान्य करावेच लागेल.
तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते. राममंदिर निर्माणासाठी अनेकांनी वेगवेगळय़ा प्रकारे किंमत मोजली आणि योगदान दिले ते असे.
नरसिंह रावांच्या पंतप्रधानपदाच्या काळात बाबरी पडली. त्यांनी बाबरी पूर्णपणे पडू दिली. राष्ट्रपती भवनात शंकर दयाल शर्मा होते. शर्मा व राव हे त्या 6 डिसेंबरला जणू बाबरीचा कलंक पुसून निघण्यासाठी प्रार्थनाच करीत असावेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तेव्हा कल्याणसिंग होते.
बाबरीचा ढाचा संपूर्ण जमीनदोस्त होताच कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला. राममंदिरासाठी कल्याणसिंग यांनी आपल्या सरकारचाच त्याग केला.
ते कल्याणसिंग आजच्या सुवर्ण सोहळ्याला मंचावर नाहीत, पण निमंत्रितांच्या यादीत तरी असावेत ही अपेक्षा. राममंदिराच्या लढय़ाने देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला व त्याच सुराचा धागा पकडत भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले हे मान्य केले पाहिजे.
लालकृष्ण आडवाणी(Lal Krishna Advani) व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली. देशातील बहुसंख्य हिंदूंच्या छातीवर पाय देऊन कुणाला राजकारण करता येणार नाही. निधर्मीपणाचे लक्षण म्हणजे फक्त एकाच धर्माचे लांगूलचालन नाही.
हिंदू समाजाला त्यांच्या श्रद्धांशी तडजोड करता येणार नाही व त्यांच्या भावना लाथाडून पुढे जाता येणार नाही. ‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोटय़वधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे.