मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात घुसखोरी, सुरक्षारक्षकाला मारहाण, 'रिपब्लिक'चे तीन पत्रकार अटकेतवेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या फार्म हाऊसमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱया ‘रिपब्लिक टीव्ही’ वाहिनीच्या तीन पत्रकारांना रायगड पोलिसांनी अटक केली. 

अनुज कुमार, यशपाल सिंग आणि प्रदीप धनावडे अशी त्यांची नावे आहेत. 

या तिघांनी फार्म हाऊसमध्ये जबरदस्तीने घुसून सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाणही केली. 

या तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

भिलवले गावच्या हद्दीत उद्धव ठाकरे यांचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर डय़ुटीसाठी तैनात असलेला सुरक्षारक्षक रात्री आठच्या सुमारास गस्त घालत होता. 

त्यावेळी भिलवले डॅमच्या ब्रिजवर उभ्या असलेल्या वॅगन आर कारमधील तिघांनी ठाकरे यांचे फार्म हाऊस कोठे आहे? अशी विचारणा केली. 

सुरक्षारक्षकाला तिघांचा संशय आल्याने त्यांनी माहीत नाही, असे उत्तर देत ते निघून गेले. 

त्यानंतर हे तीनही संशयित इसम फार्म हाऊस शोधत प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. 

या तिघांनी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश करून गार्डरूममध्ये बसलेल्या सुरक्षारक्षकाला हाच ठाकरे फार्म हाऊस आहे हे तुला माहीत असतानाही तू आम्हाला माहिती का दिली नाहीस? 

खोटे का सांगितलेस? असा आरडाओरडा केला. त्यानंतर या तिघांनीही सुरक्षारक्षकाला अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आणि तेथून ते निघून गेले.

या घटनेची माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना मिळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसवर पथक रवाना केले. 

सुरक्षारक्षकाने केलेल्या वर्णनावरून त्यांनी कार आणि त्यातील तीन संशयित इसमांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. 

त्यावेळी हे संशयित ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे पत्रकार असल्याचे समोर आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post