अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन व मराठी पत्रकार परिषदच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिन...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन व मराठी पत्रकार परिषदच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त रविवार दि.14 नोव्हेंबर रोजी लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. तसेच यावेळी चाईल्ड लाईन से दोस्ती सप्ताहाचे प्रारंभ करुन असंघटित, शालाबाह्य, आर्थिक दुर्बल व बालकामगार असलेल्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात झोपडपट्टीमधील असंघटित, शालाबाह्य, आर्थिक दुर्बल असलेले बालके सहभागी होणार आहेत. बालकांचे अधिकार व हक्कांच्या जागृतीसाठी शहरात दि.14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत चाईल्ड लाईनच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख व चाईल्ड लाईनचे महेश सुर्यवंशी यांनी दिली आहे.