अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षानंतर सुरु झालेल्या निमगाव वाघा (ता. नगर) जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्व...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षानंतर सुरु झालेल्या निमगाव वाघा (ता. नगर) जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आगमनाने ओस पडलेले शाळेचे अंगण उत्साहाने फुलले होते.
अनेक दिवसांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, माजी उपसरपंच बबन जाधव, किरण सांगळे, विजय शिंदे, वर्षा औटी, शकुंतला गव्हाणे, सरस्वती गुंड, राणी पाटोळे, सिमा फलके, बेबी शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली शाळा गुरुवारी (दि.11 नोव्हेंबर) पासून सुरु झाल्या. निमगाव वाघा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थी पालकांसह आनंदाने हजर झाले होते. शाळेच्या प्रांगणात आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मात्र शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. ऑनलाईन शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रत्यक्ष शाळेत शिक्षण आवश्यक असून, शाळा सुरु झाल्याचा आनंद सर्व पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना असल्याचे त्यांनी सांगितले.