भोयरे पठारचा बिबट्या अखेर जेरबंद नगर : भोयरे पठार गावच्या परिसरात आठवड्यापासून पाळीव मागील प्राण्यांवर हल्ले करत उच्छाद मांडणारा व नरभक्षक ...
भोयरे पठारचा बिबट्या अखेर जेरबंद
नगर :
भोयरे पठार गावच्या परिसरात आठवड्यापासून पाळीव मागील प्राण्यांवर हल्ले करत उच्छाद मांडणारा व नरभक्षक बनू पाहणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. १६) पहाटे अडकला.
नगर तालुक्यातील भोयरे पठार व हिवरे बाजार या दोन गावांच्या सीमावर्ती भागात मागील आठवड्यापासून बिबट्याचा वावर होता. या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. या बिबट्याने काही पाळीव कुत्रे व प्राण्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिक रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्यास घाबरत होते.
सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असतानाही बिबट्याच्या भीतीपोटी शेतकरी शेतात जाण्यास धजावत नव्हते. पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या नरभक्षक बनू पहात होता. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल गावडे, वनरक्षक आर. सी. अढागळे, सुरक्षा रक्षक सखाराम येणारे यांच्यासह पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा वावर असलेल्या शेतात पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.
या पिंजऱ्याजवळ शेळी बांधण्यात आली होती. मंगळवारी (दि. १६) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सदरचा बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. या बिबट्याला दूर जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्याच्या भीतीपोटी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाण्यास घाबरणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया भोयरे पठारचे सरपंच बाबासाहेब टकले यांनी व्यक्त केली.