बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार अळकुटी येथील घटना ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान वनविभागाने पिंजरा बसव...
बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
अळकुटी येथील घटना
ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत
शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान
वनविभागाने पिंजरा बसविण्याची मागणी
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील गायरान गट क्र. ९६४ मध्ये गारखिंडी रस्त्यालगत राहणाऱ्या किसन रमेश पवार यांच्या घराशेजारील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने बुधवारी हल्ला करत चार शेळ्या ठार केल्या. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास झालेल्या बिबट्याच्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किसन पवार यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातील शेळ्यांवर मंगळवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या.
शेळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने जाग येऊन लिलाबाई पवार यांनी दरवाजा उघडला असता, बिबट्या शेळीच्या करडाला जवड्यात धरून
घेऊन चालला असल्याचे त्यांनी पाहिले. दरवाजाचा आवाज येताच बिबट्या जबड्यातील सावज सोडून लिलाबाई पवार यांच्या दिशेने धावला
लिलाबाईंनी तत्काळ घराचा दरवाजा बंद केल्याने त्यांचा जीव वाचला. घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच नियतक्षेत्र वन अधिकारी हरि आठरे, वनमजूर रंगनाथ वाघमारे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अरिफ पटेल, साईनाथ विद्यालयाचे स्थानिक सल्लागार सदस्य शशिकांत कनिंगध्वज, श्रीकांत दुमणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अळकुटी परिसरात बिबट्याचे हल्ले हे नित्याचेच झाले असून बिबट्याच्या हल्ल्यात परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांचा जीव गेला आहे.