सेल्फी काढताना शेततळ्यात पडून दोघांचा मृत्यू दोघेही परप्रांतीय तरुण श्रीगोंदा : सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांचा श...
सेल्फी काढताना शेततळ्यात पडून दोघांचा मृत्यू
दोघेही परप्रांतीय तरुण
श्रीगोंदा :
सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना श्रीगोंदा शहराजवळील आनंदकर मळ्यात रविवारी (दि. २) दुपारी घडली. सुरेंद्रकुमार हारडू (वय १८, रा. बिदास, राजस्थान) व लक्ष्मण ओमनाथ (वय १७. रा. नागोर. राजस्थान) अशी शेततळ्यात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
सुरेंद्रकुमार हारडू, लक्ष्मण ओमनाथ व इतर दोन तरुण असे चौघेजण रविवारी दुपारी श्रीगोंदा शहराजवळील आनंदकर मळ्यातील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यावर गेले होते. तेथे सेल्फी काढण्यासाठी पोझ देत असताना यातील एका तरुणाचा तोल गेला व तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या तरुणाने शेततळ्यात उडी मारली. परंतु, ते दोघेही तळ्यात बुडाले. तेथे असलेल्या दोघा तरुणांनी आरडाओरडा केला. इतर लोक जमा झाले. परंतु, तोपर्यंत या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल पी. सी. शिरसाठ यांनी भेट दिली. हे दोघेही तरुण फर्निचर बनविण्याचे काम करत होते.