सुपा येथील शिवतीर्थावर फडकला १०७ फुटावर स्वराज्यध्वज सुपा गावाला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील सुपा य...
सुपा येथील शिवतीर्थावर फडकला १०७ फुटावर स्वराज्यध्वज
सुपा गावाला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा येथे दि. ११ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दुसऱ्या व पारनेर तालुक्यातील पहिल्या १०७ फूट उंचीच्या शिवतीर्थ भगव्या स्वराज्य ध्वजाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. पारनेर तालुक्यातील शिवप्रेमींनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या ध्वजाच्या लोकार्पणप्रसंगी परिसरातील शिवप्रेमी, महिलांसह शिवप्रेमी मराठी अभिनेते सचिन गवळी उपस्थित होते. दिवसभरात अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. अभिनेते सचिन गवळी यांनी शिवगर्जना दिली व त्याच दिवशी शंभू महाराज बलिदानदिन असल्याने शंभू गर्जनादेखील दिली. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारनेर तालुका अखंड शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचे सूत्रबध्द आयोजन केल्याबदद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले.
सुपा गावाला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासाशी निगडीत आहे. या इतिहासाला चालना मिळण्यासाठी व नवीन पिढीला त्यातून प्रेरणा मिळण्यासाठी या ठिकाणी चित्ररूपी शिवसृष्टी उभारण्याचा ग्रामस्यांचा मानस असून, याचाच प्रथम भाग म्हणून हा ध्वज उभारण्यात आला आहे. भविष्यात याचा उपयोग पर्यटनाच्या दृष्टीने होणार आहे. याठिकाणी लवकरच चित्ररूपी शिवसृष्टी साकारली जाणार आहे.
लोकसहभागातून व ग्रा. पं. सदस्य सागर मैड यांच्या संकल्पनेतून सदर स्वराज्य ध्वजाची स्थापना करण्यात आली. सर्व परिसर छत्रपतींच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्यासमोर उभारण्यात आलेला ७२ फूट उंचीच्या पहिल्या ध्वजानंतर सुपा येथे जिल्ह्यातील दुसरा व पारनेर तालुक्यातील पहिला १०७ फूट उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात आला आहे. तो सध्या डौलाने फडकत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.