संघर्षाचा साक्षीदार... लेखन : अँड. राहुल झावरे सरपंच, वनकुटे मराठी माणसाचा लढा लढण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त...
संघर्षाचा साक्षीदार...
लेखन : अँड. राहुल झावरे सरपंच, वनकुटे
मराठी माणसाचा लढा लढण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तत्कालिन शिवसेना नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत माझे वडील बबन झावरे यांनी देखील बेळगावमध्ये प्रवेश केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील कट्टर शिवसैनिकांचा कन्नडिगांवरील तो सर्जिकल स्ट्राईक आजही चर्चेत आहे. शिवसेना आमच्या घरात ही अशी रुजलेली.... आमदार निलेश लंके यांच्याशी माझी ओळख शिवसेनेच्या माध्यमातून २००४ ते २००५ दरम्यान झाली. निलेश लंके म्हणजेच आमचे नेते हे एक अजब रसायन आहे. मित्र म्हणून त्यांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की तो माणूस कायमचा त्यांच्यासोबत जोडला जातो. मग तो त्यांच्या पक्षाचा, विचारांचा असो अगर नसो... माणूसपणाची माणूसकीची ही ओढ त्या माणसाला नेत्यांसोबत बांधून ठेवायला भाग पडते.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. अल्पवधितच त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविली आहे. कोरोना काळात त्यांनी कोविड रुग्णांच्या सेवेचा जो काही पॅटर्न देशासमोर ठेवला त्याला तोड नाही. या सगळ्या वाटचालीत त्यांच्यासोबत मला चालता आले ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.
निलेश लंके ते नेते निलेश लंके हा प्रवास साधा सोपा आणि सरळ तर मुळीच नव्हता.
अनेक अडीअडचणींवर मात करुन ते पुढे आले आहेत. एका मोठ्या संघर्षातून त्यांनी ही भरारी मारलेली आहे. त्यांचे मूळ गाव हंगे... या गावात त्यांनी अतिशय कमी वयापासून सार्वजनिक आयुष्यात प्रवेश करीत चमक दाखविली. गावातील प्रत्येकाळी जिव्हाळ्याचे संबंध जोडले. हंगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली. ही सगळी कामे जमेस धरीत त्यांनी २००७ साली पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा निर्णय़ घेतला.
या निवडणूकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. पण त्याहीपेक्षा जास्त खेदाची बाब अशी होती की, या निवडणूकीत नेत्यांच्या वडीलांची निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम निवडणूक खर्चात गेली. वडीलांची आयुष्यभराची कमाई निवडणूकीत गेली. पराभव पत्करावा लागला. ही बाब तशी जिव्हारी लागणारी... पण नेते डगमगले नाहीत. अपयशाच्या पायऱ्यांवरुन चालतानाच यशाचे शिखर गाठता येते ही हमाखाल यशाची गुरुकिल्ली त्यांना माहित होती. तिचा वापर करुन नेत्यांनी यशाची कवाडे खुली केलीच.
सार्वजनिक आयुष्यातील अशा प्रकारच्या वागण्याला घरातून पुर्ण विरोध होता. अनेकांनी अतिशय कटू अनुभव दिले.
पण नेते डगमगले नाहीत. समाजसेवेचे हे अविरत व्रत पुर्ण कऱण्याचा त्यांचा संकल्प होता. त्यांच्या या संकल्पाने भारावून त्यांच्यासोबत चालत जाण्याचे ते वय... त्यांच्यासोबत चालण्याचा हा अनुभव मोठा विलक्षण ऊर्जादायी आहे. सुपा एमआयडीसीत नेत्यांच्या शब्दाला मोठा मान... अनेकदा इथं भांडणं होतं. अनेकदा सबुरीने घ्याने लागे. नेत्यांनी ही सगळी प्रकरणे मोठ्या कौशल्याने हाताळली. श्रमिकांना, कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला. या परिसरातील अनेकांच्या घरच्या चुली आज पेटत्या आहेत यामागे एकच नाव आहे ते म्हणजे निलेश लंके.... पण हे होत असताना एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये जसे प्रमोशन मिळते, अगदी त्याच प्रकारे एक एक गुन्हा नावावर पडत होता.
हे सगळे गुन्हे लोकांसाठी असायचे... जणून विश्वाचं रक्षण करणाऱ्या महादेवाप्रमाणे नेत्यांनी हे गुन्ह्यांचं हलाहल आपल्या कंठी धारण केलं.
या सगळ्या काळात लहान भावाप्रमाणे मी नेत्यांच्या सोबत होतो. हंग्याची लेक उक्कलगाव येथे दिलेली. तिचा संशयास्पद मृत्यु झाला. हे प्रकरण हुंडाबळीचं आहे हे स्पष्ट दिसत होतं. या सगळ्या प्रकरणात नेत्यांनी त्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर भूमिका घेतली. पण या प्रकरणात नेत्यांना खुप त्रास भोगावा लागला. अक्षरशः आपल्या वयोवृद्ध पित्याला आपल्यासाठी पोलीसांनी ओलीस ठेवल्याचे देखील पहावे लागले. सुमारे १७ दिवस श्रीगोंदा जेलमध्ये काढावे लागले. हा काळ परीक्षेचा होता. पण या परीक्षेत नेते डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले.
एकीकडे राजकीय कारकीर्द वाढत असताना दुसरीकडे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. समाजातील प्रस्थापितांची एक पिढी अनेक आव्हाने निर्माण करीत होती. या आव्हांनाचा देखील नेत्यांनी मोठ्या नेटाने सामना केला.
शिवसेना तालुकाध्यक्षपद पण एवढं सोपं नव्हतं. यातील यातील अनेक संघर्षमय प्रवास आम्हा दोघांना माहित आहे . प्रत्येक वेळेस जसे एखादी रबरी दोरी खूप ओढली तर ती ताणली जाते त्याप्रमाणे कायम संघर्ष केला. प्रत्येक निवडणुकीत अगदी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये देखील संघर्ष करावा लागला उपसभापतीपदी पद वहिनींकडे येत असताना त्यावेळचे आमदार विजय औटी त्यांचा आतून छुपा विरोध होता हे आता लपून राहिलेले नाही.
विजय औटी यांची तिसरी निवडणूक नेत्यांची सक्षम पणे हाताळली. आमदार विजय औटी यांचा विरोध असताना देखील त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक लढली. ते जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आले. तिथेच खरे औटी व लंके यांच्या संघर्षाची ठिणगी पडली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पारनेर दौरा व त्या दौऱ्यामध्ये झालेली दगडफेक पूर्ण महाराष्ट्राने पहिली तिथेच निलेश लंके पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले.
त्यानंतर आलेला वाढदिवस पारनेर नगर मतदार संघाचा महत्त्वाचा दिवस ठरला. मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून तरुण रस्त्यावर उतरला. फेसबुक व्हाट्सअप वर बोलणारा तरुण चक्क रोड व उतरून ट्राफिक जाम केलं.
त्यावेळेस औटी ना शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष पदाची संधी दिली होती. मतदार संघाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांना ते त्यावेळेस कोंडीत पकडत होते. लंके सोबत असणाऱ्या कार्यकर्त्याला कसं खिंडीत पकडता येईल याचा प्रयत्न करत होते.
त्यावेळी मी वनकुटे गावचा लोकनियुक्त सरपंच झालो होतो काय करायचं विकास च्या माघे जायचं कि मित्र सोबत जायचं हे प्रेशर होतं. माझी चौकशी लावण्यात आली पण मी डगमलो नाही. या कठीण काळात देखील नेते माझ्यासोबत उभे राहिले. आजही पांडुरंगाप्रमाणे ते आमच्या पाठीशी उभे आहेत. नेत्यांचा उदंड असे आयुष्य लाभो ही सदिच्छा.
( संकलन : गणेश जगदाळे/पारनेर)
..