वेब टीम : दिल्ली आशिया आणि युरोपमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु...
वेब टीम : दिल्ली
आशिया आणि युरोपमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु नका अशी सूचना केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसेच आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष देण्यास सांगितले. टेस्ट, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोरोनाच्या नियमांचे पालन केले जावे अशी सूचना केंद्राने केली.
केंद्राने राज्यांना कोणत्याही स्थितीत नियमांचे पालन केले जावे असे सांगितले असून सामाजिक तसेच आर्थिक गोष्टी सुरळीत सुरु राहाव्यात याकडेही लक्ष देण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, नमुन्यांची वारंवार चाचणी करा जेणेकरुन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची वेळेत माहिती मिळेल असे सांगितले आहे. तसेच लोकांनी लसीकरण करावे यासाठी प्रयत्न करण्यासही सांगितले आहे.
“दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १६ मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले,” असे भूषण यांनी पत्रात सांगितले.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असे आवाहन केले.
पत्रात पुढे ते म्हणालेत की, राज्यांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची आठवण करुन दिली पाहिजे.
भारतामध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून दिवसाला पाच हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. देशात शुक्रवारी सकाळी २५२८ रुग्ण आढळले. या बरोबर एकूण रुग्णसंख्या ४ कोटी ३० लाख ४ हजारांवर पोहोचली आहे.