शिक्षक बँक निवडणुकीचा अखेर वाजला बिगुल.... शिक्षकांतील राजकारण रंगणार कोण मारणार निवडणुकीत बाजी ? अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा प्राथमि...
शिक्षक बँक निवडणुकीचा अखेर वाजला बिगुल....
शिक्षकांतील राजकारण रंगणार
कोण मारणार निवडणुकीत बाजी ?
अहमदनगर प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची मागील एक ते दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पंचवार्षिक निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. १७ जुलैला या बँकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता दीड महिना शिक्षकांतील राजकारण तसेच आरोप-प्रत्यारोप रंगणार आहेत.
30 मे रोजी जिल्हा उपनिबंधकांनी प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्या शिफारशीनुसार शिक्षक बैंक निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी १७ जुलैला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १३ जून २०२२ ते दि. १७ जून २०२२ पर्यंत मुदत राहणार आहे. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी दि. २० जून २०२२ होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. २१ जून २०२२ ते दि. ०५ जुलै २०२२ पर्यंत मुदत आहे. तसेच दि. ०६ जुलै २०२२ रोजी चिन्ह वाटप होणार आहे. प्रत्यक्ष मतदान दि. १७ जुलै २०२२ रोजी होणार असून, मतमोजणी दि. १८ जुलै २०२२ रोजी होणार आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही शिक्षण क्षेत्रातील मोठी आर्थिक संस्था मानली जाते. त्यामुळे या आर्थिक संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिक्षक संघटना व शिक्षक नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील शिक्षकांमध्येही निवडणुकीची उत्सुकता आहे. सदिच्छा, गुरुकुल, गुरुमाऊलीचे संघटना निवडणुकीत
दोन गट, इष्टा व अन्य शिक्षक या उतरण्याच्या तयारीत आहेत. सुमारे साडे दहा हजारावर शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. बँकमध्ये नेहमी राजकारण रंगत असते. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपांच्या फेरी नेहमी झडत असतात. आता या बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी हे काम पाहणार आहेत. शिक्षकांच्या विविध संघटना बँकच्या सत्तेसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. सर्वसाधारण सभेतील राडा आणि अन्य कारणामुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या या संस्थेची निवडणूक सहकार खात्यासाठी आव्हान असते. मागील वेळी सत्तांतर झाल्यानंतरही बँकेतील कारभारावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. बँकेच्या वार्षिक सभेलाही आखाड्याचे स्वरूप. येत असते. गेल्या काही वर्षात शिक्षक बँकेची वार्षिक सभा कायम वादग्रस्त ठरत आली आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने शिक्षक नेत्यांनी आता एकमेकांवर शरसंधान करण्याची तयारी सुरू केली आहे.