पिंपरी जलसेनमध्ये धाडसी चोरी; चाकूचा हल्ला करत साडे दहा तोळे सोने लंपास पारनेर प्रतिनिधी : चाकूने मानेवर व तोंडावर हल्ला करून महिलेच्...
पिंपरी जलसेनमध्ये धाडसी चोरी; चाकूचा हल्ला करत साडे दहा तोळे सोने लंपास
पारनेर प्रतिनिधी :
चाकूने मानेवर व तोंडावर हल्ला करून महिलेच्या अंगावरील साडे दहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. चोरांच्या हल्ल्यात वसंत विष्णू पुरंदरे जखमी झाले आहेत. बुधवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे ही घटना घडली.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील गावातील मुख्य चौकातील रोकडोबा मंदिरासमोरील किराणा दुकानदार वसंत विष्णू पुरंदरे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी बुधवारी पहाटे दीड ते दोन च्या सुमारास घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात वसंत पुरंदरे व पत्नी मीनाक्षी झोपलेले होते.
घरात घुसलेल्या २ चोरट्यांनी मीनाक्षी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबडण्याचा प्रयत्न केला असता पती वसंत पुरंदरे यांनी चोरट्यांना विरोध केला. त्यावेळी चोरट्यांनी चाकूच्या सहाय्याने वसंत पुरंदरे यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात त्यांच्या मानेवर, चेहऱ्यावर डोळ्याला दुखापत झाली. चोरट्यांनी मीनाक्षी यांच्या अंगावरील दागिने व हातातील बांगड्या असे साडे दहा तोळ्यांचे सुमारे साडे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला.
घटनेची माहिती समजताच पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकला पाचारण करून पुढील तपास करत आहेत. यापूर्वी देखील गावातीलच मुख्य चौकातील पतसंस्था फोडण्याचा देखील प्रयत्न झाला होता. भुरट्या चोऱ्या तर सर्रास सुरू आहेत. यातील एकही चोरीचा तपास लावण्यात पारनेर पोलिसांना यश आले नाही. चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले असून पोलिसांना चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.
COMMENTS