सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्व ? राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी उपस्थित केला प्रश्न ...
सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्व ?
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी उपस्थित केला प्रश्न
अहमदनगर प्रतिनिधी :
शासनाने पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला पण ग्रामपंचायत सदस्यांच महत्त्व काय? असा प्रश्न अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी उपस्थित केला आहे.
मागच्या वेळी भाजपा सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी झालेल्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एक गटाचे निवडून आले. परिणामी दोन गटात सतत वादांमुळे तालुक्यात अनेक गावाचा विकास खुंटला गेल्याचे दिसून आले.
जनतेतून निवडून आल्याचा दिमाख करत अनेक सरपंचांनी मनमानीपणे गावचा कारभार करत कोणत्याहि निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणं, सदस्यांना महत्व न देणं, हम करे सो कायदा म्हणत स्वतः सरपंच ग्रामसेवकांच्या हाताशी धरून विकास कामाच्या नावाखाली गुत्तेदारी करून मलिदा लाटण्याचे असे प्रकार सुध्दा घडले आहेत..
ग्रामपंचायतीच्या अनेक निर्णय प्रक्रियेपासून सदस्यांना दूर ठेवले जात असल्याने सदस्यांना महत्वच उरले नाहीत. यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मोठी उदासीनता पाहण्यास मिळत आहे. यांची दखल घेत महाविकास अघाडीने थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द केला होता. परंतु सरकार बदलताच शिंदे फडणवीस नविन सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला. यामुळे अनेक सदस्यांमधून नाराजी सूर निघत आहे. या सरकारला जर हाच निर्णय योग्य वाटत असेल तर मग ज्या प्रकारे नगरसेवकांना प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी मिळतो. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांनाही वार्डात विकासासाठी निधीची तरतूदही करून दिले पाहिजे. कारण एखाद्या ग्रामपंचायतीत सरपंच एका गटाचा आणि सदस्य दुसऱ्या गटाचे निवडून आले.
तर परिणामी त्या सदस्यांना दुजाभाव केला जातो आणि त्या सदस्यांच्या वार्डातील विकास कामे केले जात नाहीत. अशी जर सदस्यांची कोंडीत होत असेल तर सदस्य होण्यासाठी निवडणूक तर कोण लढणार? सदस्य म्हणून निवडून येवून उपयोग काय ? असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करून सदस्यांच्या अधिकारात वाढ करून वार्ड विकासासाठी निधीची तरतूद करून दिली पाहिजे, असे मत अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी व्यक्त केले.