पारनेर तालुक्यातील १६ गावांचे कारभारी जनतेतून ठरणार ! १६ गावांना दुसऱ्यांदा मिळणार जनतेतून सरपंच निवडीचा अधिकार निर्णयामुळे कभी खुशी कभी गम ...
पारनेर तालुक्यातील १६ गावांचे कारभारी जनतेतून ठरणार !
१६ गावांना दुसऱ्यांदा मिळणार जनतेतून सरपंच निवडीचा अधिकार
निर्णयामुळे कभी खुशी कभी गम !
पारनेर/प्रतिनिधी :
राज्य शासनाने सरपंच नगराध्यक्ष या पदासाठीच्या निवडणुका जनतेतून लढवल्या जाणार असल्याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पारनेर तालुक्यातील होऊ घातलेल्या १६ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता. मात्र नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष यांची निवडणूक होणार असल्याचे जाहीर केल्याने पारनेर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतची मुदत नोव्हेंबर मध्ये संपत असल्याने या निवडणुका होऊ घातल्या असल्याने १६ गावातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. जनतेतून निवड होणारा निर्णय जाहीर झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला असून इच्छुकांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
२०१४ ला भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे राज्यभर प्राबल्य होते. दोन्ही पक्षाचे तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे संघटन होते व ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे पक्ष करत असत व त्या जोरावरच राज्यात या पक्षाची सत्ता येत होती. हे हेरून तत्कालीन भाजप सरकारने थेट जनतेतुन सरपंच करण्याचा व सत्तेत असल्यामुळे त्याचा थेट फायदा सरपंच पदाच्या उमेदवाराच्या माध्यमातून भाजपला होईल असा निर्णय घेतला गेला. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस गाव पातळीवर मोडकळीस येण्यास सुरुवात झाली होती. मात्र २०१९ ला भाजप सत्तेतून बाहेर गेल्यामुळे हा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बदलला होता. परंतु पुन्हा एकदा भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने नगराध्यक्ष, सरपंच निवड ही जनतेतून केली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
सरपंचाची निवडणूक ही यापूर्वी सदस्यातून होत असे त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर सर्व सदस्यांना महत्त्व प्राप्त होत होते. परंतु थेट जनतेतुन सरपंच यामुळे सदस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. तसेच सरपंचाला थेट अधिकार देण्यात आल्यामुळे त्याला विरोध कसा करायचा असा प्रश्न गावपातळीवर निर्माण होत आहेत. तसेच काही ठिकाणी सरपंच एका पार्टीचा व सदस्य एका पार्टीचे असण्याने गावच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो अशा काही बाबी आहेत.
तर दुसरीकडे सदस्यातून सरपंच पद घेतल्यामुळे सरपंचाला गावचा कारभार करताना कसरत करावी लागत व गावाच्या विकासाच्या कामांना अडचणी येत तसेच या सदस्यांची मर्जी सरपंचाला राखावी लागत असे त्याच प्रमाणे काही गावांमध्ये एक एक वर्षासाठी सरपंच पदाची वाटणी केली गेली व कारभार करण्यास एक वर्षच मिळाल्याने विकास कामे कधी करणार अशा समस्या येत परंतु जनतेतून सरपंच निवडीमुळे निवडून दिलेल्या व्यक्तीला पूर्ण पाच वर्ष गावचा कारभार करण्याची संधी मिळणार आहे.
दुसऱ्यांदा मिळणार जनतेतून सरपंच निवडीचा अधिकार!
तालुक्यात २०१७ साली याच १६ गावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. यावेळी सरपंच निवड ही तत्कालीन भाजप सरकारने थेट जनतेतून जाहीर केली होती. त्यानुसार तालुक्यातील सोळा गावचे सरपंच हे जनतेतून निवडले गेले होते. मात्र जानेवारी २०१२ ला तालुक्यातील झालेल्या ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच हा सदस्यातून निवडला गेला होता. परंतु पुन्हा एकदा राज्य शासनाने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्याने या १६ गावातील नागरिकांना दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच निवडीचा अधिकार मिळणार आहे.
पारावरच्या चर्चांना पूर्णविराम !
पारनेर तालुक्यातील १६ गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने सरपंच जनतेतून की सदस्यातून याबाबत गावच्या पारावर चर्चांना उधाण आले होते. मात्र जनतेतून सरपंच निवड सरकारने जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना आता थेट गावासमोर जावे लागणार आहे. या निर्णयामुळे कभी खुशी.. कभी गम ची स्थिती गावोगावी निर्माण झाली आहे.
..