तालुक्यातील इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे ! झेडपी पंचायत समिती आरक्षण सोडतीनंतरच ठरणार खरी रणनीती पारनेर प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस...
तालुक्यातील इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे !
झेडपी पंचायत समिती आरक्षण सोडतीनंतरच ठरणार खरी रणनीती
पारनेर प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी इच्छुकांची तालुक्यात मोठी संख्या आहे. आधी गट-गणांची पुनर्रचना झाली असून आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आज गुरुवारी (दि. २८) होणाऱ्या प्रारूप आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
सुरुवातीला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम लागला. जिल्हा परिषदेच्या गट-गणांची पुनर्रचना झाली.
आरक्षण सोडतीचा जाहीर झालेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. आता बांठीया आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत. २६ जुलैपासून आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करून अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव यांच्या करीता सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
सध्या गट-गणांची पुनर्रचना लक्षात घेता अनेक आडाखे बांधले जात असले तरी सर्वकाही गट-गण आरक्षणावर अवलंबून आहे. ज्याप्रकारे आरक्षण सोडत होईल, त्यानुसार अनेक इच्छुकांना तडजोड करून आपले भविष्य आजमावावे लागणार आहे. त्यामुळे गट-गणांच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
COMMENTS