कर्जुले हर्या, कासारे परिसरात रानडुकरांचा सुळसुळाट शेतकरी हातबल; वनविभागाचे विभागाचे दुर्लक्ष पारनेर प्रतिनिधी : कर्जुले हर्या परिसरातील डों...
कर्जुले हर्या, कासारे परिसरात रानडुकरांचा सुळसुळाट
शेतकरी हातबल; वनविभागाचे विभागाचे दुर्लक्ष
पारनेर प्रतिनिधी :
कर्जुले हर्या परिसरातील डोंगरावरील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून बाजरी, सोयाबीन, टोमॅटो मका अन्य पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी कर्जुले हर्या, कासारे, कारेगाव येथील शेतकऱ्यांमधून केली जात आहे. पारनेर तालुक्यात ग्रामीण भागात सध्या पाऊस चांगला झाला असून, शेतकऱ्याची पिके बहरली आहेत. परंतु अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत. टोमॅटो, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांचे रानडुकरे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सालमुख, तिवई, वाघदरा पठारावरील डोंगर भागात रानडुकरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रान डुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रानडुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लपत्या लढविताना दिसत आहे.
दरम्यान कासारे येथे काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्यामुळे तो जखमी झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. रानडुकराला हुसकवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. परंतु त्यांचा वाढत चाललेला उपद्रव लक्षात घेता वनविभागाने त्वरित योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांची रानडुकरांपासून मुक्तता करावी.
अशी मागणी कर्जुले हर्या येथील असलेले अहमदनगर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी प्रसार संघटनेचे जिल्हाप्रवक्ते अविनाश उबाळे व प्रगतिशील शेतकरी विकास हुलावळे, बाळासाहेब उंडे, संदीप उंडे, बबन वाफारे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रवीण आंधळे, अनिकेत आंधळे यांनी केली आहे.