अहमदनगर (प्रतिनिधी)- काही कोचिंग क्लासेस कॉलेज, शाळा, महाविद्यालयांशी टायप पध्दतीने शिक्षण क्षेत्राची उध्वस्ताकडे वाटचाल सुरु आह...
अहमदनगर (प्रतिनिधी)- काही कोचिंग क्लासेस कॉलेज, शाळा, महाविद्यालयांशी टायप पध्दतीने शिक्षण क्षेत्राची उध्वस्ताकडे वाटचाल सुरु आहे. पालक व विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेजपेक्षा कोचिंग क्लासवर अधिक विश्वास का वाढला? यावर आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन श्री सांदिपनी अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 61 व्या राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन नगर मधील सहकार सभागृहात झाले.
या अधिवेशनात उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना के. बालराजू बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे.के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, स्वागताध्यक्ष सुनील पंडित, शिवाजीराव काकडे, प्रा. भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, संघाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
के. बालराजू पुढे म्हणाले की, आधुनिक शिक्षण पद्धती महत्त्वाची असून, त्याला मूल्यशिक्षणाची जोड देण्याची गरज आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी हा खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो, पण त्या मोठ्या पदावर गेल्यानंतर मूल्य शिक्षणाचा अभाव असल्याने तो देशासाठी समर्पित भावनेने कार्य न करता समाज व देशासाठी संकट उभे करतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी आनखी वाढत जाते. त्यामुळे मूल्यशिक्षण हे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात विशेषत: कोरोनानंतर झपाट्याने बदल झाला आहे. या बदलाचा स्विकार करुन शिक्षकांनी पुढे जाण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी व पालक कोचिंग क्लासकडे धाव घेत आहे. शासन देखील गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती करुन घेत नाही. नाईलाजाने या शिक्षकांना कोचिंग क्लासचा आधार घेऊन आपला उदरनिर्वाह चालविण्याची वेळ आली आहे. शासनाने गुणवत्तापूर्ण शिक्षकांना संधी दिल्यास शिक्षण क्षेत्रात बदल घडणार असल्याचे बालराजू यांनी सांगितले. आजच्या शिक्षण पध्दतीवर बालराजू यांनी केलेले भाष्य अनेकांच्या मनाला भिडले. यावेळी अकॅडमीचे प्रा. नानासाहेब बारहाते, प्रा. अमित पुरोहित, प्रा. मनिष कुमार, राहुल गुजराल आदी उपस्थित होते.