टीम मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत ठाकरे गटाला एकामागून एक शिंदे गटाने दणके द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्ह...
टीम मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत ठाकरे गटाला एकामागून एक शिंदे गटाने दणके द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे गटाच्या ताब्यातून पक्षाचे धनुष्यबाण, शिवसेना नाव, संसदेमधील विधीमंडळाचे शिवसेनेचे कार्यालय आणि विधीमंडळातील शिवसेनेचे कार्यालय गेले आहे. हे य़ेथवरच थांबलेले नाही.
शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाच्या ताब्यात असणाऱ्या चल-अचल संपत्तीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडे सुमारे १९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीवर शिंदे गट दावा करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, शिंदे गटाने मोठी चाल खेळली आहे. ती म्हणजे थेट संपत्तीवर दावा करणार नसल्याचे सांगून ठाकरे गटाला सहानुभूती मिळणार नाही, याची काळजी घेतली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या संपत्तीवर दावा करणार नाही, असे मात्र म्हटलेले नाही.
शिंदे गटाचे मुख्य कार्यालयह हे आता ठाण्यात सुरू झालेले आहे. शिवसेनेच्या शिवसेना भवनवर दावा करणार नसल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. प्रत्यक्षात शिवसेना भवनची मालकी कोणाची यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना भवनची मालकी ही शिवाई ट्रस्टकडे आहे. ट्रस्टकडे मालकी असताना शिवसेना भवन हे राजकीय पक्षाकडे कसे काय दिले जाऊ शकते, याविषयी एका वकिलाने धर्मादाय आयुक्तांना नोटीस बजाविली आहे. त्यामुळे संपूर्ण शिवसेनेचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेले शिवसेना भवन हे ठाकरे गटाच्या हातून निसटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेच्या खाणाखूणा ठाकरे गटाच्या ताब्यातून जात असताना संपत्तीबाबतचा निर्णय काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर १५ मार्चला सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटावर टांगती तलवार राहणार आहे.
COMMENTS