अहमदनगर, (जिमाका वृत्तसेवा) - भारताच्या मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर जिल्ह्याचा जुलै महिन्यात शिर्डी येथे संभाव...
अहमदनगर, (जिमाका वृत्तसेवा) - भारताच्या मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर जिल्ह्याचा जुलै महिन्यात शिर्डी येथे संभाव्य दौरा असून दौ-यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संभाव्य अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, मा. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मा.राष्ट्रपती थांबणार आहेत त्या विश्रामगृह तसेच कार्यक्रमस्थळी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. सुरक्षा व्यवस्थेबाबत ब्लू बुक मधील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. मा.राष्ट्रपती ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यात यावे. आवश्यकतेनुसार रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. मान्यवर भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणी स्वच्छता राहील यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
संपूर्ण दौऱ्यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. रस्त्यावरील सर्व विद्युत तारांची तपासणी करण्यात यावी. अद्यावत आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांसह शिर्डी संस्थांनचे अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS