'२६ नोव्हेंबर' हा चित्रपट गरिबांमधील आर्थिक असमानता आणि त्यांच्या शोषणाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतो. तो त्यांना भारतीय स...
'२६ नोव्हेंबर' हा चित्रपट गरिबांमधील आर्थिक असमानता आणि त्यांच्या शोषणाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतो. तो त्यांना भारतीय संविधानाने दिलेल्या त्यांच्या स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यास शिकवतो आणि प्रेरित करतो. संविधान कोणत्याही एका विशिष्ट जातीचे, समुदायाचे किंवा धर्माचे नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अस्तित्वात आहे हे हा चित्रपट आपल्या खास शैलीद्वारे लोकांना पटवून देतो. प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाला प्राथमिक स्तरापासूनच संविधानाचे महत्त्व शिकवले गेले पाहिजे आणि प्रत्येक घरात संविधानाची प्रत कशी असावी याचा देखील हा चित्रपट आग्रह धरतो.सिनेमाचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे नाही, तर प्रेक्षकांना त्यांच्या सभोवतालच्या परिसराची आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि जगाला सर्वांसाठी राहण्याचे एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी शिक्षित आणि प्रबोधन करणे देखील आहे. '२६ नोव्हेंबर' हा चित्रपट त्याच्या शक्तिशाली कथाकथनाच्या माध्यमातून हेच करण्याचा प्रयत्न करतो."निर्माते अनिल कुमार जवादे आणि कार्यकारी निर्माते निलेश ओंकार यांची भव्य निर्मिती असलेला सचिन उराडे दिग्दर्शित '२६ नोव्हेंबर' हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट आहे
दक्षिणेपेक्षा मराठी चित्रपटांचे कथानक हे सरस असते. त्याच बरोबर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कथा हीच हिरो असते.असेच उत्तम कथानक या चित्रपटात बघायला मिळणार आहे. एक उत्तम प्रशासकीय अधिकारी कशाप्रकारे भष्ट्र नेत्याचे कारनामे बाहेर काढतो व त्याला कसा धडा शिकवतो हे या चित्रपटातून मांडले आहे. भारतीय संविधान किती महत्वाचे आहे हे देखील यातून मांडले आहे. चित्रपटाचे संगीत अर्थपूर्ण आणि सुरेल आहे. चित्रपटाची गीते प्रदर्शित होताच त्यांची लोकप्रियता वाढत आहे. चित्रपटातील एक रोमँटिक गाणे स्वप्नील बांदोडकर आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे तर दमदार शीर्षक गीत आदर्श शिंदे, पी. गणेश आणि तेजस्वी राय यांनी गायले आहे. गीतकार सचिन उराडे यांनी लिहिलेले चित्रपटातील दुःखद गाणे चित्रपटातील दमदार परिस्थिती प्रतिबिंबित करते. हे गीत प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी गायले आहे. चित्रपटाच्या शेवटी आणखी एक दमदार गाणे आहे जे गौरव चाटी यांनी गायले आहे. चित्रपटातील चारपैकी तीन गाणी निलेश ओंकार यांनी लिहिली आहेत तर अमर प्रभाकर देसाई आणि स्वप्नील राजेश चौधरी यांनी संगीतबद्ध केले आहे. त्यांचे संगीत या चित्रपटाला एका वेगळ्याच पातळीवर आणि उंचीवर घेऊन जाते.
मराठी सिनेमांचे वैभव हे पोस्टरवर दिसून येते.या चित्रपटाच्या पोस्टरवर लाल आणि काळ्या रंगांची तीव्र छटा संविधानाच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देते. मध्यभागी उठून दिसणारे ‘२६ नोव्हेंबर’ हे ठळक, दमदार अक्षरं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचा उठाव दर्शवणारा एक सळसळता समूह, हे स्पष्टपणे सांगतं की हा केवळ चित्रपट नसून, एक चळवळ आहे.या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. जुई जवादे, डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. भव्य लोकेशन्स, उत्तम गाणी, सशक्त कथा,दर्जेदार डायलॉग आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे हा सिनेमा भारी वाटतो. एक सर्वांगसुंदर चित्रपट कसा असावा हे या चित्रपटातून दिसून येते. हा सिनेमा सर्व बाबतीत सरस ठरला आहे. अनिकेत विश्वासराव याने साकारलेला अधिकारी भाव खाऊन जातो. त्याच्या भूमिकेला अनेक रंग आहेत. त्याला पल्लेदार वाक्ये आली आहेत,ती अनिकेतने उत्तमरीत्या वठवली आहे. डॉ. जुई जवादे यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांचा अभिनय लाजवाब झाला आहे. त्यांनी साकारलेली श्रावणी उत्तम असून ऍक्शन सीन्समधून डॉ.जुई यांचा अभिनय अधिकच खुलला आहे. सयाजी शिंदे यांनी साकारलेला राजकीय पुढारी सॉलिड आहे. तसेच गणेश यादव,भारत गणेशपुरे, विलास उजवणे व अंजली उजवणे यांच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत.
चित्रपटाच्या मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी प्रमुखाची धुरा श्री. गिरीश वानखेडे यांनी प्रभावी सांभाळली आहे.त्यांची कंपनी इंटायटी वन इंटरटेन्मेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत पब्लिक रिलेशन,मीडिया प्लॅनिंग,मार्केटिंग व वितरण हे कार्य करत आहे.अनेक चॅनेलसोबत टायअप,मराठी चित्रपटाचे एवढे मोठे भव्य प्रदर्शन व इनफिल्म ब्रँडिंग होत आहे.त्यामुळे हा चित्रपट विशेष आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल,असे दिसून येते. या चित्रपटात सर्वांची कामे उत्तम झाली असून नवोदित कलाकारांचा अभिनय देखील वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे भारतीय संविधानाची महती सांगणारा हा एक उत्तम चित्रपट आपण सर्वांनी सहकुटुंब बघायलाच हवा.
चित्रपट - २६ नोव्हेंबर
निर्मिती- जम्बुद्विप प्रॉडक्शन
निर्माते- अनिल कुमार जवादे व निलेश ओंकार
लेखक व दिग्दर्शक- सचिन उराडे
कलाकार - अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. जुई जवादे, डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे
स्टार - **** (४) चार स्टार