राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही; या फक्त अफवा : खा. सुप्रिया सुळे


DNALive24 : नवी दिल्ली
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांना खा. सुप्रिया सुळे यांनी अखेर पूर्णविराम दिला. राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नसून, या फक्त अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा रंगत आहे.

याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या अफवा आहेत. अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांनीही असा कुठलाही निर्णय घेण्यास विरोध दर्शविलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates