‘ईव्हीएम’लाच दाेष देणे बंद करा अन‌् कामाला लागा : अजित पवार


वेब टीम, मुंबई
‘लोकसभेचा निकाल ‘ईव्हीएम’चा होता की काय, याबाबत अनेक शंकाकुशंका आहेत. यासंदर्भात दिल्लीत लवकरच सर्व विरोधी पक्षांबरोबर संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन असून या क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही वस्तुस्थिती जाणून घेत आहोत’, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साेमवारी ईव्हीएमविरोधात राष्ट्रीय पातळीवर व्यापक आघाडी उघडण्याचे संकेत दिले. मात्र, याच कार्यक्रमात पवारांचे पुतणे व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमविराेधातील शंका अाता थांबवा अशी सूचना केली. ‘लोकसभेची चर्चा बस्स झाली. तो निकाल कसा लागला कुणी लावला, यावर चर्चा नको. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या. ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका’, असे अादेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा २० व्या वर्धापन दिन साेहळ्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाचा मेळावा पार पडला. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षातील प्रमुख नेते पवार काका- पुतण्यातील ही मतभिन्नता समाेर अाली. लाेकसभेला अपेक्षित यश न मिळाल्याने व पक्षफुटीमुळे नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांचे मनाेबल उंचावण्याच्या उद्देशाने पवार म्हणाले, ‘पक्ष स्थापनेला २० वर्षे झाली. अापल्या पक्षाला अाजवर महाराष्ट्र व गोव्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. पक्ष स्थापन झाल्यावर सत्तेत येणारा राष्ट्रवादी एकमेव पक्ष होता, हे तुमच्यामुळे घडले,’ त्यांच्या या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक दिवसाचे मानधन राष्ट्रवादी वेल्फेअर फंडासाठी देण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमापूर्वी प्रदेश आणि मुंबई विभागीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय कार्यालयापासून चव्हाण प्रतिष्ठानपर्यंत जलदिंडी काढण्यात आली. त्यानंतर चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात ज्येष्ठ दिवंगत अभिनेते गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, खासदार माजीद मेमन, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार ख्वाजा बेग, आमदार किरण पावसकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, मुंबई युवक अध्यक्ष नीलेश भोसले, नरेंद्र वर्मा आदींसह प्रमुख नेेते, पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post