सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणणार – चंद्रकांत पाटील


वेब टीम : मुंबई
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प आधीच फोडला’ असा मुद्दा विधान परिषदेत विरोधकांकडून उपस्थित झाल्यानंतर अर्थसंकल्पाचे वाचन सुरु असताना सभागृहाचे कामकाज सभापती रामराजे निंबाळकर यांनी दहा मिनिटासाठी तहकूब केले. सभापतींच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भूमिका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली.

विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प आधीच फुटल्याचे सांगून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्पाची माहिती फुटल्याचे सांगत मुंडे यांनी आक्षेप घेतला तर विरोधी सदस्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.

यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांनी दहा मिनिटासाठी बैठक तहकूब करून गटनेत्यांची बैठक घेण्याची घोषणा केली. मात्र सत्ताधारी भाजप व सेनेच्या आमदारांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली तर सभापतींच्या दालनात बैठकीसाठी न जाण्याची भूमिका घेत चंद्रकांत पाटील सभागृहातच बसून राहिले.

यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले त्यावेळी अर्थसंकल्पाचे वाचन होत असताना अशा प्रकारे यापूर्वी कधीही कामकाज तहकूब करण्यात आले नसल्याचे सांगून सभापतींच्या भूमिकेविरोधात पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अविश्वास ठराव मांडण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates