राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला ?


वेेेब टीम, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते पाटील आणि कालिदास कोळंबकर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. नव्या मंत्रिमंडळात आता कुणा-कुणाची वर्णी लागणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चाही आहे, तर शिवसेनेची एकाच वाढीव मंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे किंवा प्रशांत बंब यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. बुलडाण्यातील जळगाव-जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागेल असा अंदाज आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेते आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेच्या कोट्यातून आरोग्यमंत्रीपद मिळू शकते.

राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक झाली. रणजितसिंह मोहिते पाटीलही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले होते.


विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सर्वांना लवकरच खुशखबर मिळेल. शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेनुसार मंत्रिपद मिळतील, असे मुनगंटीवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates