जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे


वेब टीम : अहमदनगर
 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी शनिवार दि.17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन मिळण्यासाठी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी आलेले पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शिक्षकांशी चर्चा केली. प्रा.शिंदे यांनी निवेदन स्विकारुन शिक्षकांच्या प्रश्‍नाची जाणीव असल्याने या अधिवेशनात सदर शिक्षकांचा जुन्या पेन्शनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन दिले. प्रा.शिंदे यांच्यासह आ.बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदि उपस्थित होते.
 एकच मिशन, जुनी पेन्शनचा संदेश लिहीलेल्या गांधी टोप्या आंदोलनकर्ते शिक्षकांनी परिधान केल्या होत्या. प्रमुख शिक्षक नेते व समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांची यावेळी भाषणे झाली. न्याय हक्काच्या मागणीसाठी शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने दि.18 जून पासून राज्यातील सर्व शिक्षक पाऊसाळी अधिवेशन काळात मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाचा सर्वानुमते निर्धार व्यक्त करण्यात आला. दि.31 ऑक्टोबर 2005 रोजी राज्य शासनाच्या सेवेत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त होणार्‍या कर्मचार्‍यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू करण्याबाबतचे 13 मुद्दयांचे कारणे स्पष्ट करणारे निवेदन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या आंदोलनात समन्वय समितीचे महेंद्र हिंगे, आप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे, संजय इघे, बद्रीनाथ शिंदे, बाबासाहेब बोडखे, रमाकांत दरेकर, हरिभाऊ भोंदे, सुनील भोर, विशाल तागड, जाकिर सय्यद, संजय भुसारी, चंद्रकांत चौगुले, सुनील पंडित, संजय लहारे, रमजान हवालदार, देवीदास खेडकर, बापूसाहेब जगताप, आनंद नरसाळे, आबासाहेब गायकवाड आदिंसह जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post