सावेडी कचरा डेपोचा ठराव राष्ट्रवादी नेच घेतला


वेब टीम, अहमदनगर
सावेडीत कचरा डेपो आणायचा ठराव राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाला. हा ठराव महासभेत आल्यानंतर ठराव मान्यतेसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे व संपत बारस्कर हे त्याला सूचक व अनुमोदक झाले. ज्या राष्ट्रवादीने सावेडीत कचरा डेपो आणला तीच राष्ट्रवादी आता डेपो स्थलांतर करण्यासाठी आंदोलन करत आहे. त्यामुळे या नगरसेवकांची सध्याची भूमिका पाहता दोघांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याचे शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी सांगितले.

कचरा डेपो संदर्भात राष्ट्रवादीने पालिकेत आंदोलन सुरु केल्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या आरोपांना प्रत्त्युत्तर दिले. राठोड म्हणाले की, सावेडी कचरा डेपोचा विषय महासभेत राष्ट्रवादीनेच मंजूर केला. आणि आज हेच राष्ट्रवादीवाले डेपो स्थलांतरित करण्यासाठी  उपोषण,आंदोलन करत आहेत. यापाठीमागे नेमके काय गौडबंगाल आहे हे जनतेस समजले पाहिजे. त्यांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून, नगरच्या जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.

कचरा डेपोला गेल्या वर्षीही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आग लागली होती. यावर्षीही नेमक्या त्याच वेळेत आग लागली. आग लागली की कुणीतरी लावली हे महत्वाचे आहे. त्यामुळेच शिवसेनेने डेपोला लागलेल्या आगीची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली असून, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. सावेडीत असलेल्या कचरा डेपोला शिवसेनेनेच सुरुवातीला विरोध केला. डेपोच्या स्थलांतरणासाठी आम्ही आंदोलने केली. आतापर्यंत कचरा डेपोवर ५ कोटींचा खर्च झाला आहे.

डेपोच्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प करण्यात आला होता. ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस प्रक्रिया न केलेला कचरा जळाला. प्रकल्प योग्यरितीने सुरु असता तर वास आला नसता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates