संसार उघड्यावर आलेल्या शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाकडून थट्टा !


वेब टीम : अहमदनगर
नगर तालुक्यातील चास, अकोळनेर, सोनेवाडी परिसरात वर्षभरापूर्वी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसून या वादळात घरांचे,जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. तसेच शेतकर्‍यांच्या फळ बागांचे मोठे नुकसान होवून अनेक पॉलिहाऊस उद्ध्वस्त झाले होते. या घटनेला वर्ष उलटले तरी अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांना १ रुपयाही नुकसान भरपाई न देता या शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. त्यामुळे वादळग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चास तसेच अकोळनेर गावच्या परिसरात दि.३१ मे २०१८ रोजी सायंकाळी अचानक वादळ सुरु झाले. विजांच्या कडकडाटासह सुसाट्याचा वारा सुटला. जोरदार पाऊसही सुरु झाला. यावेळी वादळ एवढे प्रचंड होते की, अनेक घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे लोखंडी अँगल सह १०० ते २०० फुटांपेक्षा लांब जावून पडले होते. चास गावच्या परिसरातील विठ्ठल लक्ष्मण गोंडाळ, भाऊसाहेब किसन रासकर, अजय पंढरीनाथ रासकर,सुखदेव लक्ष्मण गुंजाळ, रामदास आमले, राजाराम आमले, आबासाहेब लक्ष्मण गुंजाळ, भाऊसाहेब लक्ष्मण गुंजाळ, मारुती दत्तात्रय गुंजाळ, बबन किसन कारले आदींच्या घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून तसेच भिंती कोसळून मोठे नुकसान झाले होते.

अकोळनेर गावाजवळील शाळेच्या मागील बाजूस असलेल्या मारुती बापूराव भोर, सोनेवाडी रोडवर बापूसाहेब नाना भोर, ज्ञानदेव महादू भोर,कविता सतीश भोर, कोळगेवाडी येथील सहादू नामदेव कोळगे, रेल्वे स्टेशन परिसरातील सात मोर्‍या जवळील पंढरीनाथ महादू उमाप,एम.आय.डी.सी. भागातील भाऊसाहेब गिताजी जाधव, भाऊसाहेब नामदेव जाधव, आदींच्या घरांचे पत्रे, जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे वादळात उडून गेले व या सर्व गोरगरीब शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर आले होते.

तसेच अकोळनेर रेल्वे स्टेशन परिसरातील अरुण अनंत भोर, भाऊसाहेब महादू भोर, शहाजी शिवराम भोर यांचे पॉलिहाऊस शेड उडाल्याने मोठे नुकसान होते. पॉलिहाऊस मधील हाताशी आलेल्या विविध पिकाचे मोठे नुकसान झाले. पॉलिहाऊस धारक शेतकर्‍याचे जास्तीत-जास्त ३० ते ४० लाख व कमीत-कमी दहा लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.मात्र भरपाई १ वर्ष उलटले तरी मिळाली नाही.त्यामुळे या वादळग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 हेच का गतिमान प्रशासन
वादळाच्या या अस्मानी संकटामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. या नुकसानीचे पंचनामे करण्याची तत्परता प्रशासनाने दाखविली व तातडीने पंचनामे केले. त्यामुळे शासनाकडून नुकसान ग्रस्तांना तातडीने भरपाई मिळेल अशी आशा होती. मात्र जनतेच्या मदतीसाठी तत्पर शासन, गतिमान प्रशासन अशा जाहिरातींचा मारा करणाऱ्या शासनाकडून वर्ष उलटले तरीही वादळग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळाल्याने हेच का गतिमान प्रशासन असा सवाल उपस्थित होत आहे. अतिशय कार्यतत्पर आणि कर्तव्य दक्ष असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच या प्रश्नी लक्ष घालून या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post