युतीबाबत माध्यमांशी बोलू नका, आमदारांना तंबी


वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे नेते गिरीश महाजन आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण झाल्याने आता शिवसेना आणि भाजपाच्या कुठल्याच मंत्री आणि आमदारांनी माध्यमांशी बोलू नये, अशी स्पष्ट तंबी त्यांना देण्यात आलीय. विधानभवनातील संयुक्त सभागृहात आज भाजपा-शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांनी ही तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
युती अभेद आहे, त्यामुळे युतीबाबत कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका असंही या दोन्ही नेत्यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांना स्पष्टपणे सांगितलं. युतीबाबत आमचं (भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे) ठरलंय, त्यामुळे कुणी युतीबाबत काय बोलतंय त्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही युतीबाबत माध्यमांशी बोलू नका, असं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी या बैठकीत सांगितले.
मुख्यमंत्री भाजपाचा होईल, किंवा भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार अशी विधाने भाजपाच्या नेत्यांनी केल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे, इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या या मंत्र्यांना दिला होता. हे वाद मिटवण्यासाठीच आजही बैठक झाल्याचं बोललं जातंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates