भारतीय बाजारात येणार 'मेड इन चायना' कार


DNALive24 : वेब न्यूज, नवी दिल्ली
देशभरातील स्मार्टफोन, टीव्ही बाजारपेठेत चिनी कंपन्यांनी पूर्णपणे वर्चस्व स्थापन केल्यानंतर आता चीनमधील कार उत्पादक कंपन्या देखील भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चिनी कंपन्या पेट्रोल, डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाप्रमाणेच सीएनजी व इले्ट्रिरक इंधनावरील कारचे भारतात उत्पादन करण्याच्या दिशेने प्रयत्न करू लागल्या आहेत..

चिनी कंपन्यांनी स्वस्त स्मार्टफोन सादर करून भारतीय बाजारपेठेत नवी क्रांती घडवून आणल्याचा इतिहास पाहाता आगामी काळात कार निर्मिती क्षेत्रात देखील या कंपन्या भारतीय आणि भारतातील विदेशी कार उत्पादक कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनमधील अनेक कार उत्पादक कंपन्या २०२० मध्ये भारतात होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होण्याचीही शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कारच्या विक्रीत मोठी घट नोंदवली जात असतानाच चिनी कंपन्या मात्र भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत. चिनी कंपनी 'मॉरिस गॅरेज'ची पहिली अत्याधुनिक कार असलेल्या 'हेक्टर'च्या सादरीकरणाची तयारी करण्यात आली असून, सोमवारपासून बुकिंग देखील सुरू झालेआहे. हेक्टर ही देशातील पहिली इंटरनेट एसयूव्ही असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

या शिवाय चीनच्याच 'ग्रेट वॉल मोटर्स'तर्फे देशातील वाहन उद्योगात सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीसह पुढील पाच वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी कारनिर्मिती कंपनी बनण्याचे स्वप्नही ग्रेट वॉल मोटर्स पाहात आहे. ग्रेट वॉल मोटर्सचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भारताच्या चकरा मारत असून, ते कंपनीच्या उत्पादन प्रकल्पासाठी जागेच्या शोधात असल्याचे वृत्त आहे. जागेसाठी त्यांची पसंती गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला असल्याचेही समजते. त्यामुळे जागा त्वरित ताब्यात घेऊन २०२२ पर्यंत पहिल्या एसयूव्हीचे उत्पादन घेण्याचाही कंपनीचा प्रयत्न आहे. चीनच्याच 'एसएआयसी मोटर्स'तर्फे लवकरच पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post