बिहार, आसाममध्ये महापुराचे तांडव; १३९ जणांचा मृत्यू


वेब टीम : पटना
बिहार आणि आसाममध्ये महापुराचे तांडव सुरुच आहे. गेल्या २४ तासांत बिहारमध्ये महापुरामुळे १२ जणांचा तर आसाममध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये आतापर्यंत ९२ तर आसाममध्ये ४७ लोकांचा बळी गेला आहे.


या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेची घोषणा केली आहे. प्रत्येक पीडित कुटुंबांना राज्य सरकार ६ हजार रुपये देणार आहे. ही मदत पीडितांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. तसेच काल, शुक्रवारी आसाममधील १० भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि राज्यातील पुरस्थितीची माहिती दिली. 

यावेळी पंतप्रधान मोदींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आसामला सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

बिहारमध्ये महापुरामुळे १२ जिल्ह्यांतील ६६.७६ लाख लोक प्रभावित झाले आहेत. सीतामढी जिल्ह्यात अधिक गंभीर परिस्थिती आहे. गेल्या गुरुवारी या जिल्ह्यात २७ लोकांचा मृत्यू झाला.
तर पूर्वेकडील राज्य आसाममध्येही महापुराने हाहाकार उडाला आहे. येथील २७ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 

येथील १.७९ लाख हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पूरग्रस्तांना आर्मी जवान मदतकार्य करत आहेत. जवानांनी गेल्या ६ दिवसांत ४८८ लोकांचा जीव वाचविला आहे. तर ४५० लोकांना मदत पोहोचवली आहे. आसाम राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाकडील आकडेवारीनुसार, पुरामुळे ३,७०५ गावांतील ४८,८७,४४३ लोक प्रभावित झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post