वेब टीम : नवी दिल्ली मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.५) संसदेत सादर करत आह...
वेब टीम : नवी दिल्ली
मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.५) संसदेत सादर करत आहेत. विकास आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परंपरेनुसार, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक वर्षापासून सुरु असलेली परंपरा मोडीत काढली आहे.
अर्थसंकल्प सादर करत असताना ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्याचे काम अर्थमंत्री सीतारामन यांनी केले आहे. या घटनेमुळे हा एक इतिहासच म्हणावा लागेल. सीतारामन यांनी आपण सादर करणार असलेला अर्थसंकल्प लाल कापडात गुंडाळून घेत अर्थ मंत्रालयात आल्या. सीतारामन यांच्याकडे ब्रिफकेस नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
मात्र, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी त्यामागील कारण सांगितले आहे. 'अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे,' असे सुब्रमण्यन म्हणाले. आपण आता गुलाम नाही, हेदेखील सीतारामन यांनी कृतीतून दाखवून दिल्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी सांगितले. थोड्याच वेळात त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.