निर्भया व कोपर्डी सारखे प्रकरणे होऊच नयेत यासठी युवतींमध्ये जनजागृती : न्यायाधीश सुनीलजीत पाटील


वेब टीम : अहमदनगर
महाविद्यालयीन जीवनात युवक-युवतींच्या संकल्पना व विचार वेगळे असतात. विद्यार्थी दशेत असतांना अन्याय, अत्याचार व संकटाला वाचा फोडणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणूनच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महाविद्यालय युवतींसाठी या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रत्येक वक्त्यने आपला विषय सखोलपणे मांडला आहे. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडली आहे. निर्भया व कोपर्डी सारखे प्रकरणे  होऊच नयेत  यासाठी युवतींमध्ये न्याय, हक्क व अधिकारा बाबत जनजागृती साठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जनजागृती उपक्रमांचे आयोजन करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व  न्यायाधीश सुनीलजीत पाटील यांनी केले.
         जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शहर वकील संघाच्या वतीने युवतींमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी राधाबाई काळे महिला महाविद्यालयात जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून न्यायाधीश सुनीलजीत पाटील बोलत होते. यावेळी शहर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शेखर दरंदले,  उपाध्यक्ष अॅड. गजेंद्र पिसाळ, सेंटर बार संघटनेचे अध्यक्ष अॅड.सुभाष काकडे, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उपप्राचार्य डि.के. औटी, सरकारी वकील श्रीमती केळगंद्रे, विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य अॅड.अभय राजे, अॅड.वृषाली तांदळे, अॅड. बेबी बोर्डे, विधी स्वयंसेवक ऋचा कांबळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक रमेश नगरकर आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी  यावेळी उपस्थित होते.
         न्यायाधीश सुनीलजीत पाटील पुढे म्हणाले, तळागाळातील व्यक्तींना न्याय देण्यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण योगदान देत आहे.  युवक-युवतींना जर आयुष्यात काहीतरी वेगळे व चांगले करायचे आहे, समाजासाठी योगदान द्यायचे आहे, अशांसाठी शासनाने व सुप्रीम कोर्टाने विधि स्वयंसेवक ही योजना सुरू केली आहे. नगर जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात इच्छुकांनी संपर्क साधावा. युवक युवतींनी  सामाजिक जाणिवेतून विधी स्वयंसेवक म्हणून काम करावे. प्रवाहाच्या विरोधात जो पोहत जातो तोच आयुष्यात यशस्वी होतो. जीवनात  लोक काय म्हणतील याचा विचार करु नका. शंभर पैकी एक व्हायचं का शंभरा मधील एक व्हायचंय हे तुम्हीच ठरवा.
          यावेळी बोलताना प्राचार्य दीनानाथ पाटील म्‍हणाले,  जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे जीवनातील महत्वाचे कायदेविषयक ज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मिळाले आहे. कायद्याचे तज्ञ दिग्गज मंडळी राधाबाई काळे महाविद्यालय आल्याचे समाधान वाटत आहे. या जनजागृती मुळे विद्यार्थिनी कायद्याविषयी सजक झाल्या असून उद्याचे आदर्श नागरिक होण्यासाठी या ज्ञानाचा त्यांना फायदा होईल. राधाबाई काळे महाविद्यालय समर्पित भावनेने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहे.
           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शेखर दरंदले   म्हणाले, आई-वडिलांकडून आपल्याला संस्कार मिळतात, गुरूंकडून शालेय शिक्षण मिळते. त्यानंतर आदर्श नागरिक होण्यासाठी तुम्हाला कायदेविषयक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे. तुम्हाला कायद्याचे ज्ञान देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आजच्या या जनजागृती शिबिराचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन कायद्या प्रति सजग नागरिक व्हावे.
        या जनजागृती शिबिरा प्रारंभ  अॅड. अभय राजे यांच्या महिलांवरील कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण या विषयावर व्याख्यानाने झाले.  यावेळी अॅड. वृषाली तांदळे यांनी अत्याचारित महिलांना नुकसान भरपाई योजना व मनोधैर उंचावणे, अॅड.  बेबी बोर्डे यांनी हुंडाबळी कायदा व विधी स्वयंसेवक ऋचा कांबळे यांनी कौटुंबिक हिंसाचार या कायद्याबद्दल सोप्या व सुटसुटीत भाषेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी स्वयंसेवक अश्विनी तावडे यांनी केले आभार विधी स्वयंसेवक केतकी महाजन यांनी मानले. यावेळी काळे महाविद्यालयाचे डॉ. एम. बी. करंडे, प्रा. एस.एन.आव्हाड, डॉ. एस.ए. कुलकर्णी आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post