शेतकरी हिताचे काम करायचे असेल, तर पीकविम्याच्या माध्यमातून करा - प्रशांत गायकवाड


वेेेब टीम : अहमदनगर
आपण सर्व शेतकरी कुटुंबातील घटक आहोत. त्याची जाणीव ठेवून काम करावे. आपला भाग दुष्काळ ग्रस्त आहे. शेतकर्‍याला पीकविम्याच्या माध्यमातून हात देण्याचे काम करा. पीकविम्याचा पैसा हा शेतकर्‍यांच्या हक्काचा पैसा आहे. तो त्याला मिळाला पाहिजे. शेतकरी हिताचे काम करायचे असेल, तर पीकविम्याच्या माध्यमातून करा, असे प्रतिपादन पारनेरच्या बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले.
    पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम 2019-20च्या जनजागृतीसाठी नगर कृषी कार्यालय येथे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एडीसीसी बँकेचे अधिकारी, तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी, सेतू केंद्र चालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सचिव यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी श्री. गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी एडीसीसी बँकेचे विकास अधिकारी एस. बी. दरेकर, जिल्हा समन्वयक विनायक पवळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, रवींद्र माळी आदी उपस्थित होते.
    श्री. गायकवाड पुढे म्हणाले की, प्रत्येक शेतकरी हा शिक्षित नाही. विम्याची माहिती भरताना बँकेचा 15 अंकी खाते नंबर व आयएफसी कोड हा व्यवस्थित टाका. चुकीचा अकाऊंट नंबर भरला तर तो शेतकरी विम्यापासून वंचित राहिल. मागील वर्षी 6330 शेतकर्‍यांना चुकीची दुरुस्ती करून दिली आहे. मागील वर्षी ज्या अडचणी आल्या आहेत, त्या या वर्षी येऊ नयेत. प्रत्येक तालुक्यात जनजागृती व्हायला हवी. सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे. शेतकर्‍याने जो विमा हप्ता भरला आहे, तो मुदतीच्या आत पुढे पाठवावा. त्याची जबाबदारी आपली आहे. हवामानाची परिस्थिती ही प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. त्यासाठी शासनाचे हवामान आधारित पीकविमा योजना ही गावनिहाय लागू करावा, यासाठीची याचिका लवकरच कोर्टात दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
    जिल्हा सहकारी बँकेचे विकास अधिकारी एस. बी. दरेकर म्हणाले की, बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कुठलीही अडचण येऊ देणार नाही. कोणत्याही योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही. ठरवून दिलेल्या विमा कंपन्यांनीही शेतकर्‍यांची अचूक माहिती भरून घ्यावी, असे ते म्हणाले. विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक विनायक पवळे, संभाजीराव गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post