पोटच्या मुलाला फरशीवर आपटून मारले, दारुड्या पित्याचे कृत्य


वेब टीम : अहमदनगर
दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणातून पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्याचा खून केला. नगरमधील तपोवन रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शुक्रवार (दि.12) सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चिराग सोहम कुमावत हे मयत चिमुरड्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, चिराग याचे वडील सोहम कुमावत व आई अर्चना कुमावत हे तपोवन रोड परिसरात राहतात. ते मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. नगर शहरात फरशी बसवण्याचे काम करीत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते नगरमध्ये वास्तव्य करतात.

गुरुवारी रात्री उशिरा तो दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळेस पत्नी अर्चना हिच्यासोबत त्याचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्याने रागाच्या भरात पत्नी व मुलाला मारहाण सुरू केली. मुलाला बऱ्याच वेळा उचलून टाकले. त्यामुळे त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या चिराग याला आई अर्चनाही उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले. डॉक्टरांनी चिराग याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समजताच तिने हॉस्पिटलमध्येच हंबरडा फोडला. याप्रकरणी पहाटेच्या सुमारास तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी चिराग याची आई अर्चना कुमावत ही तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी दाखल झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates