मी असा काय गुन्हा केला ?


वेेेब टीम : डॉ. संजय सोनवणे
वेळ सकाळी ११.३०, १२ ची. डॉक्टर आहेत का? असे विचारत एक मध्यमवयीन महिलेने ओपीडीमध्ये प्रवेश केला. तिचा चेहरा खूप संतापलेला, त्रासलेला दिसला.

"काय झालंय?" - माझा आपला नेहमीचा प्रश्न.

ती चिडून संतापाने उत्तरली - "काय झाले नाही हे विचारा डॉक्टर.

अन तिने तिची कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली.

"इतर मुली जसे संसाराचे मनी चित्र रंगवतात अगदी तसेच झाले. माझे शिक्षण सर्व अगदी व्यवस्थित झाले. छान उपवर मुलगाही मिळाला. संसार अगदी मजेत चालू होता. संसार वेलीवर पहिली मुलगी झाली. ती आत्ता १२ वर्षाची आहे. आणि लहानी ९ वर्षांची. अडचणीला खरे तर सुरुवात झाली ती लहान मुलीच्या वेळी गर्भवती राहिल्यानंतर. पोटावर एक पांढरट डाग आला. डॉक्टरांना दाखवले. पण गरोदरपणामुळे होऊ शकते, म्हणून दुर्लक्ष केले. डिलेव्हरीही व्यवस्थित झाली आणि संसारही अगदी छान चालू होता.

पण अगदीच माझ्या संसाराला ग्रहण लागावे तसेच झाले. मागील काही दिवस दुर्लक्ष केलेला डाग आत्ता त्याचे स्वरूप दाखवू लागला. आत्ता काही डाग पायावर छातीवर आणि मानेवर फिक्कट रुपात दिसू लागले. गावातील स्थानिक डॉक्टरांनी काही विटामिन्सची कमतरता असेल म्हणून उपचार करून पहिले. पण काही परिणाम नाही.

त्यानंतर शहरातील त्वचारोग तज्ञांनी पांढरे डाग, कोड असल्याचे निदान केले आणि माझ्या पायाखालील जमीन हलली. खूप दिवस उपचार केले पण काही फरक नाही. शेवटी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले काही फरक होणार नाही. आणि येथून माझा जीवन गाडा बदलला. घरातील आपुलकीने वागणारी माणसे थोडी नाही चांगलीच बदलली. एक तिरस्काराची वागणूक सुरु झाली. माझा हाताचा स्वयंपाक खाणे टाळू लागली. नवराही खूप बदलला. उठता बसता काय ही कर्माची फळे ? अशी टोमणी सुरु झाली.

नंतर शाब्दिक चकमकी आणि कधी कधी मारझोड, नंतर दारू पिऊनही धिंगाणा होवू लागला. हे सर्व सांगत असताना तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या होत्या. माहेरी बरेच दिवस गेले. तर माहेरीही हीच कटकट. लहान बहिणीचे लग्न जमायाचेय. आणि ही अवदसा घरात अाली कसे होणार ....?

कधी कधी वाटायचे जीव द्यावा. दोन तीन वेळा प्रयत्नही केला. पण अपयश आले.

नवरा डागांमुळे माझ्याकडे लक्ष्य देईना. त्याचे बाहेर अफेअर चालू झाले. मी तेही स्वीकारले. आत्ता प्रकरण खूप पुढे गेलंय. गेल्या ५ वर्षांपासून कोर्टात केस चालू होती. नंतर घटस्पोट झाला. मागील महिन्यात निकाल लागला. दोन्ही मुली नवरयाकडे राहतात. मी एकटी सध्या आई वडिलांकडे राहते. माझ्या टेन्शनमुळे वडीलही दारू पिऊ लागले. त्यांना दोनदा हृद्य विकाराचा त्रास झाला.

अाता तुम्हीच सांगा डॉक्टर परमेश्वराने काय बाकी ठेवलय? कोणता त्रास देण्याचे बाकी राहिलं? मी असा काय गुन्हा केलाय कि पांढरे डाग माझ्याच वाट्याला आले ? आणि माझा पूर्ण संसार उद्वस्त झाला?

सांगा.

तपासणी केल्यानंतर उपचार सुरू केले. पण या आजाराने तिच्या आयुष्यात जी उलथापालथ झाली, ती ऐकून मीही निरुत्तर झालो.डॉ. संजय सोनवणे यांच्याशी संपर्कासाठी -

2) पत्ता - आनंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोडेगाव, ता. नेवासे, जि. अहमदनगर

3) फोन नं. 98 22 287 376 / 97 62 378 492

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post