राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना रोखण्याचे जिल्हाध्यक्ष फाळकेंसमोर आव्हान


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून एकापाठोपाठ एक आमदार, नेते, पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत. भाजपाने पक्षातील इन्कमिंग हायजॅक करीत राष्ट्रवादीला धक्के देणे सुरूच ठेवले आहे. नगर जिल्हा ही याला अपवाद राहिला नाही.ज्येष्ठ नेते मधुकर पिचड,आमदार वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश करून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासमोर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॅमेज रोखण्याचे मोठे आव्हान आहे.


अनेक वर्षे सत्तेपासून दूर असल्याने राष्ट्रवादीला गळती लागल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. नगर जिल्ह्यातही राष्ट्रवादीसाठी आता चांगली परिस्थिती राहिली नाही. भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आ. संग्राम जगताप यांच्याही भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. कर्जतमध्ये महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड या उमेदवारीसाठी इच्छुक असून रोहित पवार यांच्याबरोबर त्यांची उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. उमेदवारी न मिळाल्यास गुंड यांची काय भूमिका राहते हे महत्वाचे आहे. राष्ट्रवादीच्या साधना कदम यांनी नुकताच भाजपात प्रवेश करून कर्जत पंचायत समितीचे सभापतिपद मिळविलेले आहे.पारनेरचे सुजित झावरे यांनी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यास वेगळा विचार करू असा इशारा दिला आहे. या परिस्थितीत आउटगोइंग रोखण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.
 फाळके हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती आहेत. त्यांचा राजकारणातील मोठा अनुभव असून ते मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. 15 वर्षे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. कर्जत पंचायत समितीचे सभापतीपद तसेच जगदंबा कारखान्याच्या उपाध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. सध्या नगर शहरासह सर्वच तालुक्यांवर लक्ष केंद्रित करून ते पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. सध्या राष्ट्रवादीसाठी परिस्थिती पोषक नाही. या परिस्थितीत विखे पाटील तसेच पालकमंत्री ना.शिंदे यांच्या झंझावाताला रोखण्यासाठी त्यांची कसब पणाला लागली आहे. त्यात त्यांना कितपत यश येते ते विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास त्यांना राष्ट्रवादीतील आउटगोइंग रोखण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post