आम्ही कुणाला बांधून ठेवू शकत नाही -अजित पवार


वेब टीम : सातारा
चौकशीचे ससेमिरा लागू नये, शिक्षण संस्था, साखर कारखाने, सूत गिरण्या, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका, जिल्हा बँका यातून काहीतरी मागे लागू नये यासाठीही काहीजण पक्षांतर करत आहेत. काही ठिकाणी आम्ही  थांबवण्याचा प्रयत्नही करू; मात्र, आम्ही कुणाला बांधून ठेवू शकत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करू पाहणार्‍या राष्ट्रवादीच्या आमदार व नेतेमंडळींना लगावला.  दरम्यान, शरद पवार यांनी राजकीय आयुष्यात अनेक स्थित्यंंतरे पाहिली आहेत. कुणाच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपणार नाही, असेही आ. अजित पवार म्हणाले.

सातार्‍यातील राष्ट्रवादी भवनात विधानसभेच्या आठही मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ. अजित पवार बोलत होते


आ. अजित पवार म्हणाले, ज्या मतदारसंघात याच उमेदवाराला संधी दिली पाहिजे, असे पक्षाचं व कार्यकर्त्यांच पक्कं मत आहे त्याठिकाणी अडचण नाही. पण काही भागात निवडणुका लागल्यावर या पक्षातून त्या पक्षात वेगवेगळे लोक स्वार्थाकरता, स्वत:च्या चौकशा थांब्याव्यात, इतर अडचणींमधून मार्ग निघावा यासाठी इकडून तिकडे जात असतात. तिथे पर्याय निर्माण करावा लागेल. कर्नाटकात घोडेबाजार होवून लोकशाहीला मारक चित्र कसं निर्माण झालं  हे  सर्वांना माहित आहे.  महाराष्ट्रात 145 विधानसभा सदस्यांचा आकडा जे पक्ष गाठू शकतील त्याचं सरकार सत्तेवर येणार  हे सत्य आहे. राष्ट्रवादी उमेदवार कमी ताकदीचा वाटला आणि दुसरा ताकदीचा उमेदवार पक्षात येवू पाहत असेल तर त्याबद्दलचाही विचार करण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रवादी पक्षातून काही लोक बाहेर पडले. मात्र, आमच्या विरोधी पक्षातील काहीजणांना आपल्याला तिकिट मिळणार नाही असं वाटत असल्याने ते आमच्या पक्षात येण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला उमेदवारी देणार का? अशी विचारणा ते करु लागले आहेत. असं सगळ्याच पक्षांबद्दल घडतंय ही महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे पक्षात फूट पडणार, हा इकडे जाणार-तिकडे जाणार, पक्ष बदलणार, पक्षांतर करणार अशा चर्चांना ऊत आला आहे, असेही आ. अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीने पक्षातील आमदारांना भरभरुन दिलं. सचिन आहिर यांना मंत्रीपद दिलं. तरीही ते दुसर्‍या पक्षात जातायतं असं विचारले असता आ. अजित पवार म्हणाले, पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाच अपक्ष आमदार आले. त्या-त्या वेळेत ती परिस्थिती असते. भविष्यात आपल्याला निवडून येणं कुठतंरी अडचणीचं वाटतं म्हणून ते पक्षातून बाहेर पडतात.  हे जाणारे लोक न जाताही भाजपा-शिवसेनेचे सरकार आलं होतं. पण भविष्यात अशा लोकांची मदत घेवून विरोधक किती कुमकुवत केलाय, किती नाउमेद केलंय हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तविक हे लोक इकडे-तिकडे जावू नयेत यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत. मात्र तरीही आम्ही कुणाला बांधून ठेवू शकत नाही, असा टोलाही आ. अजित पवार यांनी लगावला. कर्नाटक सरकारचं उदाहरण घ्या. त्याठिकाणी एकेका आमदाराला फोडण्यासाठी 20 कोटी, 30 कोटी, 40 कोटींचे आकडे आले की नाही? जे आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले ते मुंबईत येवून बसले की नाही? सुप्रीम कोटापर्यंत गेले की नाही? आपण असं काहीतर करावं असा काय चमत्कार घडला? म्हणून हा घोडेबाजार आणि त्यानुषंगाने जे काय सुरु आहे ते सर्वांनाच मारक आहे. हे दिवस कायम राहतात असे नाही. एक काळ काँग्रेसचाही पाहिला. इंदिराजी, राजीवजी, मोरारजी देसाईंचा, जनता पक्षाचाही काळ पाहिला. कार्यकर्ते नसतानाही लोकांनी नांगरधारी शेतकर्‍याला मतदान केलं होतं. समाज अस्वस्थ असला तरी देशपातळीवर नरेंद्र मोदीच पाहिजेत असे वातावरण राहिले. पुलवामा आणि बालाकोट इथं जे घडलं  त्यानंतर लोकांना दुसरा पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे तरुण, सुशिक्षित, व्यापारी अशा सर्व घटकांनी मतदान केलं. महाराष्ट्रात वंचित आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांचाही फटका आम्हाला बसला. त्यांना मिळालेली मते आमची समविचारी मते होती. त्यांना आमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याला यश मिळाले नाही. दहा ते बारा जागांवर वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मतं आणि आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मतं ही एकत्र केली तर या लाटेतही ती भाजप आणि शिवसेनेच्या मतांपेक्षा जास्त मतं होती, हे असलेलं सत्य नाकारु शकत नाही. या निवडणुकांना असे अनेक कंगोरे आहेत. सोशल मिडीयाचा वापर करणार्‍या सर्व वर्गानेही हाच विचार केला, असेही आ. अजित पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post