शेती शाळेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - गहिनीनाथ कापसे


वेब टीम : अहमदनगर
उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात शेती शाळेचे आयोजन केले असून, त्या त्या क्षेत्राच्या पिकानुसार शेतकर्‍यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍यांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.
    शिंगवे नाईक येथे मका पिकाच्या शेती शाळेंतर्गत रामनाथ जवरे यांच्या शेतातील मका पिकाची उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी पाहणी केली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, नारायण करांडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, सतीश सोनवणे, संजय मेहेत्रे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
    श्री. कापसे पुढे म्हणाले की, काही शेतकर्‍यांनी कापूस पिकामध्ये ज्वारीचे आंतरपीक घेतल्याने किडीचे नियंत्रण झाल्याचे आढळून आले आहे. मित्र किडीची संख्या पिकावर आढळून आली आहे. कीटकनाशकांचा वापर किडींच्या प्रादुर्भाव हा नुकसानीची पातळी पाहूनच फवारणी करावी. कापूस पीक हे शेतकर्‍यांसाठी शाश्‍वत उत्पन्न देणारे पीक असून, शेतकर्‍यांनी कापूस पिकाच्या शेतीशाळेसाठी उपस्थित राहून त्याच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घ्यावा. या शेतीशाळेमध्ये शेतकर्‍यांना लागवडीपासून ते थेट विक्रीपर्यंतचे तंत्रज्ञान सविस्तर समजून सांगण्यात येणार आहे. त्याचा फायदा शेतकर्‍यांना निश्‍चित होईल, असे ते म्हणाले.
    यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी मका, कापूस या पिकावर कीड व रोग व त्यांचे नियंत्रण कसे करावे, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post