साईंच्या चरणी तीन दिवसात साडे चार कोटींचे दान


वेब टीम : शिर्डी
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त व्यवस्थेच्या वतीने 15 ते 17 जुलै असे तीन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव आयोजिण्यात आला होता. या कालावधीत 4 कोटी 52 लाख रुपयांची देणगी संस्थानला प्राप्‍त झाली आहे.
दक्षिणापेटीत 2 कोटी 12 लाख 99 हजार 158 रुपये, देणगी काउंटरवर 1 कोटी 7 लाख 3 हजार 351 रुपये, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन, धनादेश-धनाकर्ष (चेक-डीडी), मनीऑर्डर देणगी आदींद्वारे 1 कोटी 3 लाख 8 हजार 180 रुपये, 18 लाख 87 हजार रुपये किमतीचे 645.015 ग्रॅम सोने,  1 लाख 30 हजार रुपये किमतीची 5032 ग्रॅम चांदी, 17 देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 8 लाख 94 हजार 444.50 यांचा त्यात समावेश आहे.
श्रीगुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत 1 लाख 86 हजार 783 साईभक्‍तांनी दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून, ऑनलाईन व सशुल्क दर्शन आरती पासेसद्वारे 67 लाख 45 हजार रूपये प्राप्‍त झाले आहेत. तसेच उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयामध्ये 2 लाख 541 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेतून 2 लाख 10 हजार 400 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले.
या कालावधीत 1 लाख 78 हजार 146 प्रसादरुपी लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली. तसेच श्री साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्‍त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साईआश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा येथे 49 हजार 554 साईभक्‍तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सुमारे 5 हजार 819 साईभक्‍तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच साईधर्मशाळा येथे 40 पालख्यांची निवास व्यवस्था करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post