भर पावसाळ्यात मराठवाड्याची तहान मृत साठ्यावर


वेब टीम : बीड
मुंबई, पुण्यासह कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना मराठवाड्यात मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाचा पत्ता नाही. मराठवाड्यातले सर्व धरणात पाण्याचा मृतसाठा असून या भागातील जनतेची तहान सध्या मृत साठ्यावर आहे.  पावसासाठी गावागावांत देव पाण्यात ठेवले जात आहेत. पेरणी योग्य पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसून येत आहेत. आजही ९०० पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे तर छावण्या बंद झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत. थोड्या फार पावसाच्या शिडकाव्यावर ज्या शेतकर्‍यांनी पेरा केला त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येते की काय, अशी भयावह स्थिती सध्या जिल्ह्याची आणि उभ्या मराठवाड्याची होऊन बसली आहे.

मराठवाड्याचा दुष्काळवाडा होऊन बसलेल्या औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, लातूर, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात अत्यल्प पावसाचे शिडकावे झाले आहेत. आधीच दुष्काळाने हाहाकार माजवलेल्या मराठवाड्यात यंदाही पावसाळ्याचा पहिला महिना कोरडा गेल्याने मृतसाठ्यात असलेल्या तलावामध्ये पाण्याचा थेंबही जमा झालेला नाही. सध्या मराठवाड्याची तहान मृत साठ्यावर भागवली जात आहे. मराठवाड्यातील बहुतांशी भागात अजून पेरा झाला नाही. ज्यांनी पावसाच्या शिडकाव्यावर पेरा केला त्या शेतकर्‍यांना दुबार पेरणीची भीती सतावत आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळाची भयानकता अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून पेरणी योग्य पाऊस झाला नाही. आधीच दुष्काळ असल्याने यावर्षी तरी पाऊस होईल या आशेवर बसलेल्या शेतकर्‍यांना पावसाने पुन्हा चिंतेच्या चितेत ढकलून दिले आहे.

बीड जिल्ह्यात आजही नऊशेपेक्षा जास्त टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त छावण्या बीड जिल्ह्यात उभारण्यात आल्या होत्या. मात्र शेती कामे आणि पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी आपआपली जनावरे घरी घेऊन गेले. शासनाने ९९ टक्के छावण्या बंद केल्या. मात्र पाऊसच नसल्यामुळे आता घरी आणलेल्या जनावरांना काय खाऊ घालायचे? हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आ वासून उभा आहे. एकीकडे दुष्काळरुपी वेताळ तांडव करत असताना दुसरीकडे श्रध्दाळू आणि आशावादी लोक पावसासाठी गावागावांत देव पाण्यात ठेवत आहेत. अनेक खेडे गावांमध्ये धोंडी मागीतली जात आहे. पाऊस हा निसर्गाच्या हातात असल्याने शासन-प्रशासन व्यवस्थाही हतबल झाली असून भयावह परिस्थितीने जिल्ह्यात चिंतेचे ढग अधिक गडद होताना दिसून येत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post