तिवरे धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती : महाजन


वेब टीम : मुंबई
चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसंच धरण फुटीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असंही महाजन यांनी सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. या घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले असून 19 जण बेपत्ता आहेत. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

याविषयी गिरीश महाजन म्हणाले की, "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दापोली लघुपाटबंधारे विभागाचं हे छोट धरण होतं. आतापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. गावकऱ्यांनी धरण फुटल्याची, गळत असल्याची तक्रार केली होती. जलसंपदा खात्यांतर्गत हे धरण येत असल्याने दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही दुरुस्ती केली असं उत्तर दिलं होतं. परंतु आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत."

"आता या धरणाच्या आजूबाजूच्या गावांना धोका नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. धरण आता रिकामं झालं आहे. धरण फुटल्यानंतर सर्वात मोठा तडाखा जवळच्या पहिल्याच गावाला बसला. या गावातील काही घरं वाहून गेली आणि त्यासोबत 24-25 जण बेपत्ता झाले. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर गावातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं असून आवश्यक मदत पुरवली जात आहे," असंही गिरीश महाजन यांनी नमूद केलं.

"मुख्यमंत्री रात्रीपासून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मी स्व: तिथे जाणार आहे. दुरुस्ती झाल्याचं अधिकारी सांगत आहे. परंतु या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच बेघरांना मदत दिली जाईल," असंही महाजन म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates