370 कलम हटवणे हा केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय - जयकुमार रावल


वेब टीम : मुंबई
राष्ट्राची वर्तमान आवश्यकता लक्षात घेऊन जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याबाबत केंद्र सरकारने आज घेतलेला निर्णय हा सर्वांगाने देशहितकारी व अभिनंदनीय आहे. भारतीय राजकीय इतिहासातील ही क्रांतिकारक घटना आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या या निर्णयातून देशाचे हित साध्य होईल. देशातील जनतेच्या भावना आणि एकसंघ भारताची संकल्पना याचे प्रतिबिंब या निर्णयात आहे.  370 कलम हटवण्याबरोबरच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन लढाख हा स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापनेचा आणि जम्मू-काश्मीरलाही केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णयही कौतुकास्पद आहे. यामुळे आता एक भारत- श्रेष्ठ भारत, एक संविधान-एक निशाण या संकल्पना प्रगल्भतेने देशात रूढ होतील. जम्मू काश्मिर प्रदेशातील जनतेच्या वेगवान विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शांतीपूर्ण विकासातून  जनतेचे सर्वांगीण हित होणार आहे, असा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.

या क्रांतिकारी निर्णयाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post