राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिकेत अधिकारी धास्तावले


वेब टीम : अहमदनगर
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर यांच्या बदलीमुळे महापालिकेतील राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारात वाढ होण्याची शक्यता असल्याने अधिकारी धास्तावले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. पैठणकर यांच्यावर विविध आक्षेप ठेऊन त्यांना निलंबित केले होते. डॉ. पैठणकर नेहमीच महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी राहिलेले आहेत. निलंबनानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.

निलंबित केलेल्यांची चौकशी सुरू असताना ती पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकार्‍यास किमान त्याच विभागात पुन्हा नियुक्ती देऊ नये, असा नियम असतानाही महापालिकेने तो नियम धाब्यावर बसविला. डॉ. पैठणकर यांना पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभागात प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली.

डॉ. पैठणकर यांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रशासनातही एकमत नसल्याचे समोर आले आहे. महापालिका सभेत हा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने डॉ. पैठणकर यांचे निलंबन मागे घेण्याला आणि त्यांना पुन्हा घनकचरा विभागात प्रमुखपदी नियुक्ती करण्यावर आक्षेप नोंदवत प्रशासनाला धारेवर धरले.

याच सभेत आरोग्य विभागाची जबाबदारी असलेले उपायुक्त सुनील पवार यांनीही डॉ. पैठणकर यांना पुन्हा कामावर कसे घेतले गेले, याची मलाच माहिती नसल्याचे सांगितले. तसेच नियमानुसार त्यांना त्या विभागात नियुक्ती देता येत नसल्याचेही स्पष्ट केले. यावरून प्रशासनातही डॉ. पैठणकर प्रकरणात एकमत नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे या सभेत डॉ. पैठणकर यांच्या नियुक्तीचा विषय वादग्रस्त होणार याची कल्पना प्रशासनाला अगोदरच होती. नेमके या सभेला ऐनवेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी अनुपस्थिती दर्शवत सभेसाठी तोंडी आदेशाने उपायुक्त पवार यांना आयुक्त म्हणून प्राधिकृत केले.

ही सर्व प्रशासकीय कार्यवाही झाली. मात्र यात राजकारण देखील मोठ्याप्रमाणात शिरले आहे. डॉ. पैठणकर यांना पुन्हा कामावर घ्यावे, यासाठी एका नेत्याने आग्रह धरल्याचे बोलले जाते.

या नेत्याचे आणि शिवसेनेचे वितुष्ट आहे. या नेत्याच्या शिफारसीवरून डॉ. पैठणकर यांना पुन्हा त्याच विभागात घेतल्याचा संशय शिवसेनेला आहे. त्यामुळे शिवसेनेने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला.

महासभेत विषय उपस्थित केल्यानंतरही डॉ. पैठणकर यांना घनकचरा विभागातून हलविण्यात येत नसल्याचे समोर आल्यानंतर काल पुन्हा शिवसेनेच्या उपनेत्यासह काहींनी आयुक्तांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिला.

यामुळे तडकाफडकी डॉ. पैठणकर यांची बदली करण्यात आली. या प्रकारामुळे महापालिकेतील राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे व राजकीय इर्षेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

 बदलीच्या ठिकाणीही वादाची शक्यता
डॉ. पैठणकर यांची घनकचरा विभागातून आरोग्य विभागात बदली केली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या अधिनस्त त्यांनी काम करावे, असे बदली आदेशात म्हटले आहे. डॉ. पैठणकर आणि डॉ. बोरगे यांच्यातील विसंवाद यापूर्वी अनेकदा शहराने पाहिलेला आहे. महापालिका कर्मचारी, अधिकार्‍यांनाही हा वाद माहिती आहे. त्यामुळे बदलीच्या ठिकाणीही वातावरण सकारात्मक राहील, याची शक्यता कमी असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर महापालिकेत होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post