कलम ३७० रद्द करण्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान


वेब टीम : दिल्ली
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात नॅशनल कॉन्फरन्सने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते अब्दुल गनी लोन यांच्या मुलगा व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अकबर लोन आणि हसनैन मसूदी यांनी कलम ३७० रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

जम्मू-काश्मीरचे दोन तुकड्यांत केलेले विभाजन असंवैधानिक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचे या अर्जात नमूद केले आहे. कलम ३७० संदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, नुकतेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात येणारे कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कलम ३७० रद्द करण्याआधी केंद्र सरकारने येथील परिस्थिती चिघळण्याची चिन्हे लक्षात घेऊन काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती.

तसेच, तब्बल ३८ हजार जवान काश्मीर खोर्‍यात तैनात करण्यात आले होते. दरम्यान काल जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल केली आहे. तसेच, काल काही भागात शाळा, महाविद्यालये, एटीएम, दुकाने सुरू केली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post