नारी शक्तीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे - सुजित विधाते


वेब टीम : अहमदनगर
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महिलांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे, त्यासाठी त्या झगडल्या. महिलांचे सबलीकरण व्हायला हवे, हे त्यांचे स्वप्न होते. आजही काही महिला चूल आणि मूल या चौकटीच्या बाहेर आलेल्या नाहीत. नारी शक्तीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले महिला उद्योग समुहाचे संचालक सुजित विधाते यांनी केले.

सावित्रीबाई फुले महिला उद्योग समुहाच्या माध्यमातून भारत बचाव नारी शक्ती जगाव या अभियानांतर्गत महिला व पुरुष बचतगटांना मार्गदर्शन करताना उद्योगसमुहाचे संचालक सुजित विधाते बोलत होते. याप्रसंगी आरोग्यवर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. हेमांगिनी पोतनीस, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला मालपाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे ट्रेनर रविराज भालेराव, श्रीराम शिंदे, सुनील गायकवाड, दादासाहेब चंदन आदी उपस्थित होते.

विधाते पुढे बोलताना म्हणाले की, महिला बचतगटाने बनविलेले साहित्य विक्रीसाठी अडचण येते. महिला उद्योगाला चालना देण्यासाठी नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर महिला बचतगटांना प्रशिक्षण देऊन दुकाने काढून देणार आहे. आतापर्यंत उद्योगसमुहाच्या माध्यमातून 250 बचतगटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जरूपी अर्थसाह्य केले असून, पन्नास हजार महिलांना अ.नगर महापालिका, महिला विकास महामंडळ व पंचायत समिती बचतगटाच्या माध्यमातून उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे प्रशिक्षण दिले आहे. 700 ते 800 महिलांना सक्षम उद्योग उभा करून दिला आहे. चारचाकीचे क्लच लॉक हे भारतातील पहिले पेटंट प्रोडक्ट अ.नगर येथील महालक्ष्मी बचतगटाच्या अध्यक्षा रोहिणी घोडके यांनी बनविले. ही नगरच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असे ते म्हणाले.

महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला मालपाणी म्हणाल्या की, महिला उद्योगाला चालना मिळाली पाहिजे. महिलांचे सबलीकरण झाले, तर कुटुंबाची आर्थिक घडी सुधारेल. महिलांना व्यवसायासाठी अशा व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज आहे. सावित्रीबाई महिला उद्योग समुहाच्या माध्यमातून महिलांनाच नव्हे, तर कृषी बचतगटांनाही व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, त्याला या माध्यमातून आळा बसेल, असे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post