पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार : कोल्हा'पुरात' ५१ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले


वेब टीम : कोल्हापूर
जिल्ह्यातील 11,482 कुटुंबांतील तब्बल 51 हजार 785 लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानांतून एका बोटीसह 22 जणांचे पथक तसेच गोवा कोस्टलगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह दाखल झाले आहे. मंगळवारी सकाळपासूनच ‘एनडीआरएफ’ आणि लष्कराने बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

जलसंपदामंत्री शिरीष महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.  तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला. महापुरामुळे सलग चौथ्या दिवशी रेल्वे, एस.टी. आणि खासगी वाहतूक ठप्प झाली.

मंगळवारी पहाटेच ‘एनडीआरएफ’ आणि लष्कराचे पथक प्रयाग चिखली, आंबेवाडीकडे चार बोटींसह रवाना झाले, तर शहरासाठी दोन बोटींसह मदत देण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी नौसेनेच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्याचबरोबर गोवा कोस्टलगार्डचे एक हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झाले आहे.

नौसेनेने आणखी 14 बोटी देण्याचे मान्य केले आहे. उपलब्ध बोटी आणि लष्करासह इतर पथके प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदतीसाठी पाठविली असून, आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टिंग सुरू करण्यात येणार आहे.

दिवसभरात ‘एनडीआरएफ’चे 27 जवान आणि चार बोटींसह दाखल झाले असून, बचावकार्यास सुरुवात केली आहे. नेव्हीचे 24 जवान चार बोटींसह दाखल झाले आहेत. लष्कराचे जवान सोमवारीच दाखल झाले असून, मंगळवारी आणखी एक तुकडी दाखल झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post