पाकिस्तानात खायचे वांदे; अन्न पदार्थाच्या किमती वाढल्या


वेब टीम : इस्लामाबाद
पाकिस्तानी अर्थव्यवस्था पार रसातळाला गेल्याने महागाईशी तोंड देताना पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकीनऊ आले.

देशभरात नान आणि रोटीच्या वाढलेल्या किंमती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत.आता या किंमती कमी कराव्यात अशी सूचना पंतप्रधान इम्रान खान यांनी केली.या महागाईला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

दहशतवादापासून ते भ्रष्टाचारापर्यंतच्या विविध समस्यांमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडली आहे. त्यात महागाईने भर घातली असून, नान व रोटीच्या किंमतीचा मुद्दा ऐरणीवर आला.

सध्या पाकिस्तानच्या विविध भागांत नान १२ ते १५ रूपयाला, तर रोटी १० ते १२ रूपयांना मिळते.पाकिस्तान सरकारने स्वयंपाकाचा गॅस, इंधनाचे दर वाढवले तसेच धान्याच्या किमतीही वाढल्या परिणामी नान आणि रोटीचे भाव वाढले होते.या भाव वाढीपूर्वी नान ८ ते १० रूपये, तर रोटी ७ ते ८ रूपयांना मिळत होती.

नान आणि रोटीचे भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन्हीचे दर पूर्ववत करण्याची सक्तीची सूचना जारी केली आहे.

तसेच यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश आर्थिक समन्वय समितीला दिल्याची माहिती विशेष माहिती सल्लागार डॉ. फारूक आशिक अवान यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post