राष्ट्रवादीत तुमचे नातेवाईकही का थांबेनात? पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार भडकले


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला लागलेली गळती, पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना, भारतीय जनता पक्षात केलेले प्रवेश यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पत्रकार परिषदेत पवारांचे लक्ष्य वेधले. 

मात्र प्रश्न विचारताना पद्मसिंह पाटलांसह नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याचा उल्लेख झाल्याने पवारांचा पारा चढला आणि ते भडकले. ‘पक्षात येण्या-जाण्याची क्रिया चालूच असते. नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठे’ असा प्रतिप्रश्न पवारांनी उपस्थित केला. 

संबंधित पत्रकाराने माफी मागावी,असेच प्रश्न असतील तर मला बोलायचे नाही, असे म्हणत पवारांनी पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला.

श्रीरामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. प्रश्न विचारताना सभ्यता बाळगा असं त्यांनी संबंधित पत्रकाराला सांगितले. 

‘अशा लोकांना परिषदेला बोलवत जाऊ नका. निदान मी असताना तरी बोलवू नका. नाहीतर मग मलाच बोलवू नका.’ अशा शब्दांत उद्दिग्न झालेल्या पवारांनी आयोजकांना ठणकावले. या सर्व प्रकारामुळे पत्रकार परिषदेचे वातावरणच बदलले. 

पवारांनी पुन्हा परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांनी केलेली विनंती विचारात घेऊन ते पत्रकारांनी नंतर विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले.

नगर जिल्हा पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही दिवसात या जिल्ह्यातून पवारांना खंबीर साथ देणारे जेष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 

त्यापाठोपाठ जिल्ह्यातील अनेकजण पक्षांतराच्या विचारात असल्याने राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर चलबिचल निर्माण झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post