विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी युवकांनी सज्ज व्हावे – सुजात आंबेडकर


वेब टीम : अहमदनगर
2019 ची विधानसभा निवडणूक ही आपल्या अस्मितेची अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत करा, बुथ कमिटी व पन्ना कमिटी मजबूत करा आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीची युवानेते सुजात आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व एम.आय.एम. च्यावतीने आयोजित युवक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारिपचे युवा जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदेवे यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या युवक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव तथा युवक प्रदेशाध्यक्ष अमित भुईगळ होते. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते दिशा शेख, भारीपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. अरुण जाधव, शहर महासचिव सुनील शिंदे, जिल्हा महासचिव दिलीप साळवे, विनोद गायकवाड, अॅड. भानुदास होले, शाळीग्राम राऊत, एम.आय.एम.शहराध्यक्ष जावेद शेख, भारीपच्या कर्जत तालुका महिलाध्यक्ष सरस्वती घोडके, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली भडांगे आदी विचारपीठावर उपस्थित होते.

युवकांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर म्हणाले, की युवक ही वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे. जिथे जिथे अन्याय, अत्याचार दिसेल तिथे युवकांनी मदतीसाठी धावून गेले पाहिजे. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशातील मोदी सरकार व राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली. देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात जातियवाद व दलित, मुस्लिम, भटके, आदिवासींवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. अन्याय अत्याचारविरुद्ध आवाज उठविणार्‍या व्यक्तींना देशद्रोही ठरवण्यासाठी कायदा केला जातो. रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, महम्मद अखलाख यांच्या हत्या झाल्या. राज्यातील भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात महापुराने थैमान घातले असताना फडणवीस सरकार मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. तुमचा इलेक्शन मोड कधी संपणार आहे? असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला विचारला. हे मनुवादी सरकार जर पुन्हा सत्तेत आले तर प्रत्येक गावात भीमा कोरेगाव आणि खैरलांजी हत्याकांड घडेल, तेव्हा न्यायव्यवस्था आणि भारतीय संविधान वाचविण्यासाठी या जातीवादी सरकार विरुद्ध लढा दिला पाहिजे.

अमित भुईगळ म्हणाले, बाळासाहेब आंबेडकर तुम्हा आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी 40 वर्षापासून लढा लढत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी 48 छोट्या जातीतील व्यक्तींना उमेदवारी दिली. पण नगर जिल्ह्याने ही संधी हुकवली ती चूक पुन्हा विधानसभेत करू नका. नगर जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

अॅड.अरुण जाधव म्हणाले, इथली प्रस्थापित व्यवस्था दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिमांना वेठीस धरून गुलाम बनविण्याचे काम करीत आहे. तेव्हा ही व्यवस्था बदलण्यासाठी सत्ता परिवर्तनासाठी छोट्या जातीसमूहाने वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन पक्ष संघटनाची वज्रमूठ बांधा, सावड करा आणि इथली मस्तवाल सत्ता उलथून टाका.

अशोक सोनवणे म्हणाले, नगर जिल्ह्यातून बाराचे बारा आमदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील, त्याचबरोबर नगर शहराचा आमदारदेखील वंचित बहुजन आघाडीच होईल. यावेळी डॉ.परवेज अशरफी, अॅड. भानुदास होले, शाळीग्राम राऊत, विजय देवतरसे, सरस्वती घोडके, आम्रपाली भडांगे यांचीही भाषणे झाली. सागर भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अक्षय भिंगारदिवे, विजय गायकवाड, आकाश जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. मेळाव्यास भारिप, वंचित व एम.आय.एम.चे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post