वेब टीम : मुंबई लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत ऐतिहासिक तीन तलाक विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात तीन तलाकप्र...
वेब टीम : मुंबई
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत ऐतिहासिक तीन तलाक विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात तीन तलाकप्रकरणी गुरुवारी रात्री पहिला गुन्हा दाखल झाला आहे. मुंब्रा पोलिसांनी एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासू-सासरे यांच्याविरुद्ध नवीन कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
मुंब्रा येथे राहणाऱ्या जन्नत बेगम इम्तियाज पटेल (31) हिचा विवाह ठाणे येथे राहणाऱ्या इम्तियाज पटेल यांच्यासोबत 2015मध्ये झाला होता. जन्नत हिचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे. तिचा पती इम्तियाज आखाती देशात नोकरी करतो. विवाहानंतर काही महिन्यांनी इम्तियाज नोकरीनिमित्त परदेशात निघून गेल्यानंतर सासू-सासरे तिला पैशांसाठी त्रास देऊ लागले.2017 मध्ये पती इम्तियाज घरी आल्यानंतर तिने पतीला ही गोष्ट सांगितली, मात्र त्याने त्याच्या आईवडिलांची बाजू घेतली आणि जन्नतला तिच्या माहेरी सोडून गेला. पती इम्तियाजने जन्नतच्या वडिलांकडे मोटरसायकल घेण्यासाठी पैसे मागितले होते. जन्नतच्या वडिलांनी जावयाची मागणी पूर्ण केली होती.
इम्तियाजने विक्रोळीत राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाला. या वादातून नोव्हेंबर 2018 मध्ये इम्तियाजने जन्नतच्या मोबाईल फोनवर तीन वेळा तलाक म्हणून तिच्याकडून काडीमोड घेतला तसेच तिच्या व्हॉट्सऍपवर तीन वेळा तलाक तलाक तलाक असे लिहून पाठवले होते. बुधवारी ऐतिहासिक तीन तलाक विधेयक मंजूर होताच जन्नतने गुरुवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी मुस्लिम महिला कायदा 2019 कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.